
प्रतिनिधी : मच्छिंद्र कांबळी यांच्या वस्त्रहरण या नाटकाने एकेकाळी महाराष्ट्राला खदखदून हसवले होते. २७ एप्रिलला पुन्हा एकदा मालवणी भाषेतील हे धूमशान नाटक रंगमंचावर येत आहे. गडकरी रंगायतनमध्ये या नाटकाचा ५२५५ वा प्रयोग होतो आहे. त्यानंतर प्रमुख सेलिब्रिटींच्या संचात नाट्यरसिकांसमोर ४६ प्रयोग केले जातील.
वस्त्रहरण नाटकाला १६ फेब्रुवारीला ४४ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने प्रारंभीचे दोन आणि नंतर आणखी ४४ असे ४६ प्रयोग केले जाणार आहेत.
या नाटकात मच्छिंद्र कांबळींच्या अजरामर अशा तात्यांच्या भूमिकेत दिगंबर नाईक चमकणार असून पुष्कराज चिरपुटकर मास्तरच्या भूमिकेत असतील. प्रियदर्शन जाधव (दुर्योधन), सुनील तावडे (विदुर), रोहन गुजर (दुःशासन), अंशुमन विचारे (अर्जुन), ओंकार गोवर्धन (युधिष्ठिर), अरुण कदम (शकुनी मामा), प्रणव रावराणे (प्रॉम्प्टर), मुकेश जाधव (गोप्या), किशोरी अंबिये, रेशम टिपणीस अशी सगळी एकापेक्षा एक सरस कलाकारांची मांदियाळी आहे.
सेलिब्रिटींसह नाटक करण्याची ही तिसरी वेळ असून अशा प्रकारचे ३० प्रयोग २०१२ मध्ये झाले होते. नाटकाचे निर्माते प्रसाद कांबळी यांनी सांगितले की, वेगवेगळ्या कलाकारांना घेऊन मालवणीत नाटक करणे ही एक धमाल आहे. गेली तीन वर्षे माझा प्रयत्न होता त्याला आता मूर्त रूप येत आहे. ५२५५ आणि ५२५६ क्रमांकाचे प्रयोग झाल्यावर बाकी ४४ प्रयोग मुंबई, ठाणे, कल्याण, वाशी येथे होतील. त्यानंतर ५३०० वा प्रयोग वेगळ्या पद्धतीने सादर होईल आणि मग नाटक थोडा विराम घेईल.



