ताज्या बातम्या

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वेगमर्यादा पाळा अन्यथा भरावा लागणार भुर्दंड

प्रतिनिधी : जलद गती प्रवासाचा मार्ग म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आता वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. घाट क्षेत्रामध्ये आणि उर्वरित मार्गावर वेग मर्यादा वेगळी असणार आहे. त्यामुळे आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना सर्व प्रकारच्या वाहनांना वेग मर्यादेचे पालन करणे अनिवार्य असणार आहे, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. 

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात, मात्र अनेक वाहने वेगमर्यादेचे पालन करताना दिसत नाहीत. सद्यस्थितीत मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर समतल भागासाठी असलेली वेगमर्यादा 100 किमी प्रतितास असून घाट भागामध्ये आल्यानंतर वेगमर्यादा 50 किमी प्रतितास आहे. मात्र एक्सप्रेस वे वर वेग मर्यादेचे पालन होत नसल्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर अपर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य सुखविंदर सिंह यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यात त्यांनी वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. वेगमर्यादा घाट क्षेत्रामध्ये वेगळी आणि उर्वरित मार्गावर वेगळी असणार आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना यापुढे सर्व प्रकारच्या वाहन चालकांनी वेगमर्यादेचे पालन केले नाही तर त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. विशेष म्हणजे वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून होणार आहे. 94 किलोमीटर अंतराच्या एक्सप्रेस वे वर सर्वत्र गॅन्टी उभारत त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

अधिसूचनेनुसार, किलोमीटर क्रमांक 35.500 ते किमी 52.00 हा भाग घाट क्षेत्र म्हणून आणि उर्वरित समतल भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आता प्रवासी वाहनांमधून चालकासह आठ प्रवासी प्रवास करत असतील तर समतल भागामध्ये वाहनाचा वेग तासी 100 किमी आणि घाट क्षेत्रामध्ये 60 किमी असणार आहे. तसेच ज्या प्रवासी वाहनांमधून चालकासह नऊ व त्यापेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करत असतील त्यांच्यासाठी समतल भागामध्ये ताशी वेग 80 किलोमीटर आणि घाट क्षेत्रामध्ये 40 किलोमीटर अशी वेग मर्यादा असणार आहे. याशिवाय माल आणि साहित्य वाहतुक करणाऱ्या वाहनांसाठी समतल भागामध्ये वेगमर्यादा ताशी 80 किलोमीटर आणि घाट क्षेत्रामध्ये 40 किलोमीटर निश्चित करण्यात आली आहे. 

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top