मुंबई – विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या वतीने यंदाच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. युद्ध पत्रकार दि.वि गोखले यांच्या जयंतीचं औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा येत्या रविवार दि. २३ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. साप्ताहिक विवेकच्या संपादिका अश्विनी मयेकर यांच्या हस्ते पुरस्कार सोहळा पार पडणार असून त्यात विद्यार्थ्यांसाठी कानमंत्र-‘स्वत:ला पत्रकार म्हणून घडवताना’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
गरवारे शिक्षण संस्थेकडून यंदा २०२३-२४ मध्ये वर्गात प्रथम आलेल्या कु.वनश्री राडये यांना दि.वि गोखले पुरस्कार, पुढारी वृत्तवाहिनीचे सुशांत सावंत यांना विद्याधर गोखले पुरस्कार तर लोकमत ऑनलाइनचे प्रविण मरगळे यांना डॉ. अरूण टिकेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यात अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांताच्या वतीने राज्यस्तरीय लेखन स्पर्धेच्या पुरस्काराचेही वितरण करण्यात येईल. हे पुरस्कार वितरण ज्येष्ठ पत्रकार आणि कवी दुर्गेश सोनार यांच्या हस्ते होणार आहे.