ताज्या बातम्या

उसाला दर न देणाऱ्या कारखान्यावर कारवाईसाठी रयत संघटनेचे निवेदन

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्याची उसाची मोळी म्हणजे सत्ताधारी असे समीकरण झाले आहे. त्यामुळेच
रयत संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यामध्ये रयत क्रांती संघटनेच्या वतीने उसाला दर द्यावा अन्यथा साखर कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी रयत संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सातारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा जाणीवपूर्वक रयत संघटना प्रयत्न करत आहे. लोकशाही मार्गाने जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस यंत्रणा व सामान्य नागरिक यांना कोणताही त्रास होऊ नये. असे शांततेने आंदोलन असते. याबाबत चुकीचा अर्थ काढून रयत संघटनेला उग्र आंदोलन करण्यास प्रवृत्त करत आहेत. अशी शंका वाटत आहे.
आदरणीय जिल्हाधिकारी साहेब सध्या वाढती महागाई व दिवसेंदिवस शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. ही गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या बाबत ज्वलंत प्रश्न समोर आलेला आहे. याला कारण म्हणजे शेती पिकाला हमीभाव जाहीर करूनही सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांशी संबंधित सत्ताधारी उसाला हमीभाव देण्याची इच्छा व्यक्त करतात पण व्यापारी प्रवृत्ती व कारखानदार यांची इच्छा दिसत नाही.
सातारा जिल्ह्यामध्ये १७ खाजगी व सहकारी साखर कारखाने आहेत. लोकप्रियतेसाठी साखर कारखानदार उसाच्या हमीभाव जाहीर करतात. श्री रंगराजन समितीने सादर केलेल्या ऊस दर अहवालानुसार शेतातून काढल्यानंतर ऊस पिकाचे १४ दिवसात उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देणे कायद्याने बंधनकारक आहे. सध्या तीन महिने होऊन सुद्धा एकाही शेतकऱ्याला उसाचे दर मिळाले नाहीत. कारखान्याची संबंधित मंत्री आमदार झाल्यामुळे शेतकऱ्यांना वाली राहिलेला नाही. अशा शब्दात शेतकरी नेते प्रकाश साबळे यांनी खंत व्यक्त केली आहे.
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या कुटुंबात लग्नसराई, आजारपण, वार्षिक यात्रा आणि शेतीसाठी लागणारे भांडवल उभे करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. सध्या मार्च अखेरमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज भरावे लागत आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला ऊस साखर कारखानदारांनी घेऊन गेलेले आहेत. आता त्या ऊसाला दर देण्याची मानसिकता कारखानदारांनी दाखवणे गरजेचे आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे आठ आमदारांपैकी चार मंत्री आहेत. यापैकी तीन मंत्री थेट साखर कारखान्याशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांचे नैतिक जबाबदारी वाढलेली आहे.
यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखाना ,सह्याद्री सहकारी साखर कारखाना, श्रीराम जव्हार सहकारी साखर कारखाना, अथणी शुगर शेवाळेवाडी ,ग्रीन पॉवर गोपुज, स्वराज खटाव पडळ, श्री दत्त इंडिया, शिवनेरी आणि महत्वाचे म्हणजे स्वातंत्र्य सैनिक किसनवीर सातारा सहकारी साखर साखर कारखान्यांनी उसाचे दर जाहीर केलेले आहेत पण. जाहीर केलेल्या दराप्रमाणे उसाचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. सातारा जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अन्यथा रयत संघटना भर उन्हामध्ये साखर कारखानदार व जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणे विरोधात आवाज उठवावा लागेल. असा ही इशारा दिला आहे.
.
_________________________________
फोटो रयत संघटनेच्या वतीने निवासी उप जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना शेतकरी नेते प्रकाश साबळे (छाया- निनाद जगताप सातारा)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top