प्रतिनिधी (DDM न्युज) : वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्ह आर्ट एक्सपो 2025 या प्रतिष्ठित कला प्रदर्शनाची दुसरी आवृत्ती 6 ते 9 मार्च या कालावधीत मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरी,येथे आयोजित करण्यात आले आहे.
हे कलाप्रदर्शन विविध कला प्रकारांचा सुसंवादी संगम आहे. चित्रकला, शिल्पकला, फोटोग्राफी आणि इतर व्हिज्युअल आर्ट फॉर्म्स यांचा सुरेख मिलाफ याठिकाणी पाहायला मिळेल. हे प्रदर्शन कलाकार, गॅलरी आणि रसिकांना कला समुदायाशी जोडण्याची, सहयोगाची आणि नव्या संधी शोधण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देणार आहे,अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी राजन जाधव, प्रवीण गांगुर्डे व उद्योजक व कला संग्राहक दिनेश आडोळे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात दिली.
हे कलाप्रदर्शन विविध कला प्रकारांचा सुसंवादी संगम आहे—चित्रकला, शिल्पकला, फोटोग्राफी आणि इतर व्हिज्युअल आर्ट फॉर्म्स यांचा सुरेख मिलाफ याठिकाणी पाहायला मिळेल. हे प्रदर्शन कलाकार, गॅलरी आणि रसिकांना कला समुदायाशी जोडण्याची, सहयोगाची आणि नव्या संधी शोधण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देत आहे.
या प्रदर्शनात प्रमोदबाबू रामटेके, भगवान रामपुरे, पद्मश्री सुधारक ओलवे, रतन साहा, प्रा. मोग्गलन श्रावस्ती, पद्मनाभ बेंद्रे, जी. वाय. गिरी, पृथ्वी सोनी, नरेंद्र पटेल, चंद्रकांत तजबिजे, विक्रांत शितोळे, सचिन खरात, उमाकांत कानडे यांसारख्या नामवंत आणि व्यावसायिक कलाकारांच्या अप्रतिम कलाकृती रसिकांसमोर सादर होणार आहेत.
2024 मध्ये वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्हच्या पहिल्या आवृत्तीने प्रचंड यश मिळवले होते. कला रसिक, संग्राहक आणि व्यावसायिक यांच्याकडून मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे या प्रदर्शनाने आपली प्रतिष्ठा निर्माण केली आहे. या वर्षीची दुसरी आवृत्ती अधिक भव्य आणि प्रभावी ठरणार असून, यामध्ये माहितीपूर्ण कला चर्चा, परिसंवाद, थेट प्रात्यक्षिके आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील.
प्रदर्शनाच्या माध्यमातून कलारसिकांना मूळ कलाकृती खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होईल. #BuyOriginalArtwork मोहिमेअंतर्गत, कलासंग्रहात मूल्यवान आणि अर्थपूर्ण कलाकृतींची भर घालण्याचा संदेश दिला जात आहे. कलाकृती म्हणजे केवळ शोभेच्या वस्तू नसून त्या संस्कृती, सर्जनशीलता आणि कलाकाराच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असतात.
सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी राजन जाधव आणि प्रवीण गांगुर्डे, तसेच उद्योजक व कला संग्राहक दिनेश आडोळे यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन आकाराला आले आहे. या भव्य उपक्रमाचे आयोजन आन्सर्स वन वर्ल्ड या अनुभवी इव्हेंट व्यवस्थापन कंपनीने केले आहे, जिने २० वर्षांच्या अनुभवासह ३०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.