Sunday, December 15, 2024
घरमनोरंजनचला हवा येऊ द्या फेम डॉ निलेश साबळे घेऊन येत नवीन कॉमेडी...

चला हवा येऊ द्या फेम डॉ निलेश साबळे घेऊन येत नवीन कॉमेडी शो ; हसताय ना ? हसायलाच पाहिजे

प्रतिनिधी : सलग दहा वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. १७ मार्च रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड पार पडला होता. त्याच्या काही दिवस आधीच डॉ. निलेश साबळेने हा शो सोडला होता. ‘चला हवा येऊ द्या’ बंद झाल्याने असंख्य प्रेक्षकांची नाराजी झाली होती. मात्र आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे निलेश साबळे मनोरंजनाचा धमाकेदार खजिना घेऊन येत आहे. निलेश साबळेसोबतच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हेदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला निलेश साबळेच्याच एका प्रसिद्ध वाक्यावरून नाव देण्यात आलं आहे. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’, असं या कार्यक्रमाचं नाव आहे.

‘हसताय ना, हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमाचं लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहे. यात भाऊ कदम, ओंकार भोजने यांच्याशिवाय सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकार त्यांना साथ देणार आहेत. तर महाराष्ट्राचे कॉमेडी किंग आणि अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
डॉ. निलेश साबळेनं आपल्या बहारदार विनोदाने अवघ्या महाराष्ट्राला हसवलं. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात त्याचा चाहतावर्ग निर्माण झाला. मराठी मनोरंजनसृष्टीत त्याचे अनेक चाहते आहेतच पण बॉलिवूडमध्येही त्याने अनेक सुपरस्टार्सना आपल्या कॉमेडीचे जबरदस्त फॅन केले. भाऊ कदम यांनीही आपल्या मिश्किल चेहऱ्याने आणि निखळ विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तसंच ओंकार भोजनेही त्याच्या खास शैलीमुळे प्रेक्षकांचा लाडका झाला. आता विनोदाचे हे तीन हुकमी एक्के एकत्र येत आहेत. पुन्हा एकदा नव्या जोशात, नव्या जल्लोषात विनोदाची चौफेर आतषबाजी करायला ते सज्ज झाले आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवायला येत असलेला ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ हा शो कलर्स मराठी वाहिनीवर येत्या 20 एप्रिलपासून शनिवार – रविवार रात्री 9 वाजता पाहायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments