इस्लामपूर : विद्यार्थ्यांनी अभ्यासोबत कला जोपासावी. कला आयुष्यातील ताणतणाव दूर करण्याचे काम करते असे मत सुप्रसिध्द अक्षरगणेश कलाकार डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले ते कासेगांव एज्युकेशन सोसायटीच्या वतीने लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेप्रसंगी बोलत होते. स्पर्धेचे हे बारावे वर्ष आहे. यावेळी व्यासपीठावर कासेगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव आर.डी.सावंत, सदस्य सुभाष आडके सर, सांगली जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीकांत माळी, राजारामबापू पाटील चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप पाटील, कलाशिक्षक व्ही.व्ही.ठोंबरे, के.एम.लोहार, एस.एम.गुरव, जयंत करिअर गाईडन्सचे एस.पी.यादव, कासेगांव शिक्षण पतसंस्थेचे अध्यक्ष एस.एस.पाटील सर्व शाखांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
डाॅ.संदीप डाकवे पुढे बोलताना म्हणाले की, कला जोपासण्याबरोबर विद्यार्थ्यांनी अभ्यास, सोशल मिडीयाचा कमीत कमी वापर, आई वडील, शिक्षक यांच्या सूचनांचा आदर केला पाहीजे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पूर्वीच्या काळी कलाकारांना राजाश्रय होता. तशाच प्रकारे कासेगांव शिक्षण संस्थेतील कलाशिक्षकांना प्रेरणा देण्याचे काम होत आहे ही कौतुकाची बाब आहे.
दरम्यान, जयंत करिअर गाईडन्सचे एस.पी.यादव यांनी विद्यार्थ्यांच्यात आत्मविश्वास वाढवण्यासाठी जयंत सप्ताह उपक्रम राबवल्याचे सांगितले. याशिवाय संस्थेने स्पर्धा परीक्षा, उद्योजक भेटी, क्षेत्र भेटी यासारखे नावीण्यपूर्ण उपक्रम सुरु असल्याचे सांगितले. यावेळी स्पर्धेतील विजेत्या शाळांच्या मुख्याध्यापक यांना फलक आणि प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.
दरम्यान, डाॅ.संदीप डाकवे यांनी विविध शब्दातून रेखाटलेले लोकनेते राजारामबापू पाटील यांचे शब्दचित्र यावेळी संस्थेचे सचिव आर.डी.सावंत यांच्याकडे सुपुर्द केले. या चित्राचे उपस्थितांनी कौतुक केले.
चित्रकला स्पर्धा व अन्य स्पर्धा राबवत संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. डाॅ.संदीप डाकवे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या चित्रामध्ये अक्षरांचा व चित्रांचा संगम पहायला मिळतो आहे. एक वेगळी चित्रशैली आज पहायला मिळाली. त्यांचे मनापासून कौतुक अशा शब्दात संस्थेचे सचिव आर.डी सावंत सर यांनी प्रास्ताविकपर भाषणात आपले मनोगत व्यक्त केले.
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांच्यासमोर अक्षरगणेश कलाकार डाॅ.संदीप डाकवे यांनी अक्षरगणेशाचे प्रात्यक्षिक केले. विद्यार्थ्यांनी देखील असे अक्षरगणेश साकारण्याचा प्रयत्न केला. यानंतर चित्रकला स्पर्धेतील विजेत्या मुलांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देवून गौरवण्यात आले. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने झाली. चित्रकला स्पर्धेमध्ये मुलींचा सहभाग लक्षणीय होता. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धा संपेपर्यत विद्यार्थी यांचेसोबत त्यांचे पालकही उपस्थित होते. चित्रकला स्पर्धेचे परीक्षण श्रीकांत माळी, प्राचार्य प्रदीप पाटील, प्राचार्या अर्पिता पवार, के.एम.लोहार, एस.एम.गुरव यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलाशिक्षक मानसिंग जाधव यांनी, सुत्रसंचालन आर.पी.मोहिते यांनी तर आभारप्रदर्शन प्रकाश गावडे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय रोकडे, मानसिंग जाधव, सुधाकर पाटील, अविनाश कांबळे, अरविंद कोळी, मनीषा सुर्वे, बल्लाळ सर या सर्व कलाशिक्षकांनी विषेश परीश्रम घेतले.




चौकटीत :
अक्षरगणेशाचे प्रात्यक्षिक आणि अॅटोग्राफ साठी झुंबड :स्पर्धेच्या हाॅलमध्ये डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटलेल्या सुमारे 40 शब्दचित्रांचे प्रदर्शन मांडले होते. सोबत त्यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमांच्या बातम्या आणि फोटो होते. त्याचे अवलोकन मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी केले होते. त्यामुळे डाॅ.डाकवे अक्षरगणेशाचे प्रात्यक्षिक सादर केल्यावर त्यांची अॅटोग्राफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडाली असल्याचे पहायला मिळाले.