Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशविटा शहर पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विटा शहर पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे



मुंबई, दि.२९:- सांगली जिल्ह्यातील विटा शहर नळ पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

या योजने संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह बैठक झाली. बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, सांगली जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर तसेच अमोल बाबर, तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ के. एच. गोविंदराज आणि विविध विभागांचे सचिव, वरिष्ठाधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या योजनेला लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. तसेच पाणी उपलब्धतेसह अनुषांगिक तांत्रिक बाबी आदी प्राधान्याने पूर्ण करून घेण्यात याव्यात आणि योजना मार्गी लागेल यासाठी कार्यवाही करावी असे निर्देश दिले.

राज्यस्तरीय नगरोत्थान महाअभियानांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे. सुमारे ८७ कोटी १८ लाख रुपये खर्चाच्या या योजनेत कृष्णा नदीवरून आणि टेंभू उपसा जलसिंचन योजनेतील ओझर तलाव येथून असे दोन स्त्रोत असणार आहेत. योजनेत पहिल्या टप्प्यात २०२५ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून ४. ६९ दलघमी पाणी उपलब्ध करून घेतले जाणार आहे. यातून विटा शहराची दैनंदिन १२. ८६ द.ल.लीटर पाण्याची गरज भागविता येणार आहे.
विटा शहराची २०५५ पर्यंतची १ लाख चार हजार ३३५ ही लोकसंख्या गृहीत धरून या योजनेचा आराखडा तयार केला गेला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments