मुंबई (रमेश औताडे) : सत्तेतून पायउतार होण्यासाठी काही महिने शिल्लक असताना , महायुती सरकारने आर्थिक योजनेच्या घोषणा देत जनतेला फसविण्याचा काम सुरू केले आहे. मात्र त्यांनी केलेल्या मनमानी कारभाराची पोलखोल आता आम्ही करणार आहे. असे सांगत खासदार वर्षा गायकवाड यांनी शनिवारी मुंबई काँग्रेस कार्यालयातील पत्रकार परिषदेत ” महायुतीचे पापपत्र ” प्रसिद्ध केले. आता आम्ही या पापपत्राच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असल्याचेही खा. वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
लाडकी बहिण, लाडका भाऊ, असे सर्व लाडके योजनेत येत आहेत. मात्र अदाणी सारख्या अनेक लाडक्या मित्रांना दिलेले कंत्राट, मलाईच्या योजना आम्ही आता या पाप पत्रातून बाहेर काढत आहोत. धारावी पुनर्विकास आणि अदाणी हे समीकरण अदाणी मित्रांनी इतके गुंतागुंतीचे करून ठेवले आहे की, अदाणी यांचे खिसे भरण्याचेच धारवीचे कंत्राट आहे असा आरोप खा. वर्षा गायकवाड यांनी केला.
लहान भाऊ मोठा भाऊ व जागांचे गणित पाहण्यापेक्षा महाराष्ट्र वाचविण्याचे काम आम्ही मित्रपक्ष करत आहोत असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. आ. विश्वजित कदम, मा. आ. मधु चव्हाण , प्रवक्ते सचिन सावंत, आनंद शुक्ला, सुरेशचंद्र राजहंस, युवराज मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.