प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या काही जागाचा तिढा सुटत नव्हता,मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे आणि कल्याण मधील शिवसेनेचा गड अबाधित ठेवला आहे.त्यामुळे विद्यमान खासदार डॅाक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे कल्याण लोकसभेतूनच लढणार आहे. ठाणे लोकसभेकरता उमेदवाराचे नाव जवळपास फायनल झाले आहे. लवकरच ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी महायुतीची महाप्रचार रॅली काढण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपाचा विषय अजूनही रखडला आहे. त्यात कल्याण, ठाणे, नाशिक, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जागांवर तिढा कायम आहे. परंतु आता ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचा सस्पेन्स संपला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीत या जागांवर निर्णय घेण्यात आला. या दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. त्या शिवसेनेकडेच राहणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता या ठिकाणी एक-दोन दिवसांत शिवसेनेकडून उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे.
भाजपाने ठाणे, कल्याण लोकसभा मतदार संघावर दावा केला होता. परंतु शिवसेनेचा बालेकिल्ला त्यांच्याकडे अबाधित राहिला आहे. ठाणे, कल्याण लोकसभेच्या जागा शिवसेनेच्याच बाजूने गेल्या आहेत. भाजप श्रेष्ठींनीच ठाणे, कल्याण लोकसभेच्या जागा शिवसेनेच्याच असल्याचा निर्वाळा दिला आहे. शनिवारी रात्री ‘वर्षा’वरील बैठकीत ठाणे आणि कल्याण लोकसभा जागेबाबत निर्णय झाला. या दोन्ही जागा शिवसेनेलाच देण्याचा निर्णय झाला.