मुंबई : दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या विस्तारासाठी मुंबईतील मानखुर्द येथे अतिक्रमणमुक्त करण्यात आलेली सुमारे १४ एकर शासकीय जमीन उपलब्ध झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार , महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकूळे यांच्या उपस्थितीत या जागेचा मालमत्ता पत्रक महामंडळास सुपूर्द करण्यात आला.
महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या जागेच्या हस्तांतरणासाठी महसूल विभागाशी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्यात आली. दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी जागेचे हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी स्थापत्य उपअभियंता विजय बापट , तहसीलदार दिलीप रायनवार उपस्थित होते.
चित्रनगरीच्या सध्याच्या परिसराव्यतिरिक्त चित्रीकरणासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत विविध पर्यायी जागांची पाहणी करण्यात येत होती. या प्रक्रियेत मानखुर्द येथील अतिक्रमणमुक्त शासकीय जागा निदर्शनास आली. या जागेवर चित्रीकरणासाठी उपकेंद्र विकसित करण्याचा प्रस्ताव महामंडळाने शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावास मान्यता मिळाली.
या जागेवर मुंबईच्या पूर्व उपनगरात चित्रनगरीचे स्वतंत्र उपकेंद्र विकसित करण्याचे नियोजन आहे. हे उपकेंद्र दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापनाखाली कार्यरत राहणार आहे.
आजच्या सोहळ्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव महेश व्हावळ, मुख्य वित्तीय अधिकारी चित्रलेखा खातू, स्थापत्य उपअभियंता विजय बापट यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.




