मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमस्थळी आता दरवर्षी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने कायमस्वरूपी मान्यता दिली असून, यापुढे प्रत्येक वर्षी स्वतंत्रपणे परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. या दोन्ही महत्त्वाच्या दिवशी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात यावी, अशी मागणी अनुयायांकडून सातत्याने केली जात होती. या मागणीची दखल घेत सरकारने दरवर्षी पुष्पवृष्टी करण्यास मंजुरी दिली आहे.
पुष्पवृष्टीसाठी विमानचालन संचालनालय, मुंबई यांच्याशी समन्वय साधून हेलिकॉप्टर उपलब्ध करणे, आवश्यक सुरक्षा परवानग्या मिळवणे तसेच कार्यक्रमाच्या वेळी हेलिकॉप्टर योग्य ठिकाणी पार्किंग करून निर्धारित वेळेत उपलब्ध ठेवणे, या सर्व बाबींचे नियोजन करण्याची जबाबदारी मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांच्या वतीने समाधान व्यक्त होण्याची अपेक्षा आहे.




