सातारा(अजित जगताप) : दुष्काळी भागाला माण – खटाव तालुक्याला पाणी मिळावे म्हणून विधिमंडळामध्ये आक्रमक आंदोलन करणारे भाजपचे माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी कालव्यातील बंदिस्त पाईपलाईन बाबत शिवसेना आ. महेश शिंदे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याला वाढता पाठिंबा मिळत आहे.
महाराष्ट्र सरकारने सर्व धरणाचे पाणी उघड्या कालव्या ऐवजी बंदिस्तपाईपलाईनने देण्याचा निर्णय घेतला त्याचे स्वागत केले आहे. पाण्याची बचत होऊन
मूरून जाणारे तसेच बाष्पीभवन आणि नष्ट होणारे पाणी वाचले जाणार आहे व त्यामुळे
मोठ्या प्रमाणात सिंचन क्षेत्र वाढू शकते व त्याप्रमाणे अनेक धरणांची उघडे कॅनॉल रद्द
करून बंदिस्त पाईपलाईनने पाणी देण्यास सुरुवात झाली आहे. असे स्पष्ट करून भाजपचे माजी आमदार डॉ. येळगावकर यांनी
पत्रकार परिषदेत सांगितले की,सातारा जिल्ह्यात उरमोडी हे धरण पूर्ण झाल्यानंतर आज पर्यंत या धरणाचा स्वतःचा
असा मुख्य कालवा नाही. उरमोडीचे पाणी बंदिस्त पाईपलाईनने खटाव माणला देण्याबाबत अनेक आंदोलने केल्यामुळे दुष्काळी भागाला पाणी देण्याची बाब मंजूर झाली आहे. आठमाही योजना असूनही उरमोडीचे चे पाणी खटाव माणला भिक
मागितल्यासारखे वर्षातून एक किंवा दोन वेळा मिळत आहे.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी
सातत्याने प्रयत्न करून उरमोडी योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईनने देण्याबाबत प्रयत्न केले
आहेत व त्यास मंजुरी मिळूण या कामाचे टेंडरही निघाले आहे,
मात्र ,गेल्या आठ पंधरा दिवसापूर्वी सातारा जिल्हा परिषदेच्या बैठकीमध्ये एनवेळचा
विषय घेऊन व सदस्यांची मते न घेता या पाईपलाईनला विरोध करण्यात आला. यानंतर
कोरेगाव पंचायत समितीने देखील अशाच पद्धतीने खटाव माणच्या जखमेवर मीठ
टाकण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही ठरावांना माझा तीव्र विरोध असून एकतर्फी निर्णय
घेणाऱ्या या सदस्यांचा मी तीव्र स्वरूपात निषेध करीत आहे. असेही भाजपचे माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ठासून सांगितले.
सातारा जिल्ह्यातील मंजूर असलेल्या गावांना पाणी देण्यास आम्ही कधीही विरोध
करणार नाही मात्र बंदिस्त पाईपलाईन होऊनच
देणार नाही. या भूमिकेला आम्ही कडाडून विरोध करू व प्रसंगी रस्त्यावर उतरू व माजी
आंदोलने कशी असतात ही सर्व जिल्ह्यांने व राज्याने देखील पाहिली आहेत. उरमोडी
योजनेचे पाणी ज्या कण्हेर कालव्यामधून कोंबडवाडी पर्यंत येत आहे. तो कालवा अत्यंत जीर्ण
झाला असून अनेक वेळा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. कोंबडवाडी
पासून खटाव माणचे हक्काचे पाणी गेली अनेक वर्ष सांगली जिल्ह्याला जात आहे. याचा
सातारा जिल्ह्यातील विरोध करणाऱ्या नेत्यांनी कधीतरी विचार केला आहे का ?
कोरेगावचे आमदार हे कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष असून देखील राज्य सरकारच्या
महत्वकांक्षी निर्णयाला विरोध करणार असतील तर कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष पदावर
राहण्याचा त्यांचा अधिकार नाही. असे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचा नाम उल्लेख टाळून माजी आमदार डॉ. येळगावकर यांनी इशारा दिला आहे.
त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी सोळशी योजना मंजूर करून त्यांच्या मतदारसंघाचे नंदनवन करून दाखवावे. खटाव माणच्या पाण्याला विरोध कराल तर खटाव तालुक्यातील एक मत मिळू देणार नाही. याची गंभीर दखल घ्यावी.
जिहे कटापूर ( गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार ) कृषी सिंचन योजना ही केवळ
खटाव- माण तालुक्यासाठी असताना ही योजना चारमाही असल्याने अन्यायकारक आहे. ती आठमाही
करण्यासाठी कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष प्रयत्न का केले नाहीत? खटाव- माणला पाणी मिळून
न देता अन्य ठिकाणी पाणी वळून नेण्याचा निर्णय हा त्यांच्या भावी राजकीय जीवनाला
धक्कादायक आहे. हे त्यांनी समजून घ्यावे. असे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला डॉक्टर दिलीप येळगावकर यांच्या समवेत श्रीमती येळगावकर व संजय जाधव उपस्थित होते.




