
मुंबई (शांताराम गुडेकर ) : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मादगुडेवाडी येथे गुरुवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागून नऊ घरांचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत नऊ कुटुंबांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच शिवसेना चांदिवली विधानसभा आमदार दिलीप (मामा) लांडे यांनी भूमिपुत्र या नात्याने घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. यावेळी संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक आणि शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. बाधित शेतकरी कुटुंबांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार आमदार दिलीप लांडे यांच्या वतीने नऊ बाधित कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत, धान्याचे किट, कपडे आणि घरगुती भांड्यांचे वाटप करण्यात आले. या दुर्घटनेत शांताराम रामभाऊ वाल्हेकर, गणपत लक्ष्मण वाल्हेकर, पांडू गेनू वाल्हेकर, कृष्णाबाई सोमा वाल्हेकर, हौसाबाई कोंडिबा वाल्हेकर, भाऊ सदू वाल्हेकर, गोविंद लक्ष्मण वाल्हेकर, रमेश दिनकर वाल्हेकर आणि दत्तात्रय रामभाऊ वाल्हेकर यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. यावेळी आमदार दिलीप लांडे याच्यासह तहसीलदार राजेंद्र नजण, मंडळ अधिकारी मनोज ढवळे, ग्रामसेवक विकास सोनवणे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. संकटाच्या काळात बाधित कुटुंबांना तातडीने मदतीचा हात मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.




