ताज्या बातम्या

छत्रपतींच्या रयतेच्या राज्याची संकल्पना आजच्या संविधानात- शंभूराजे देसाई

सातारा(अजित जगताप) – साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले. यामध्ये सर्वसामान्य प्रजेचे हित जपले होते. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा विचार केला .त्याचेच प्रतिबिंब आजच्या संविधानात अंतर्भूत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनात समाविष्ट असलेल्या सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले प्रतापगडावर संविधान दिनानिमित्त ‘गडाचा मान, संविधानाचा सन्मान’ हा कार्यक्रम पालकमंत्री श्री देसाई यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी पालकमंत्री श्री देसाई बोलत होते. यावेळी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवन संरक्षक अमोल सातपुते, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अमोल सातपुते आणि शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाप्रमुख रणजीतसिंह भोसले, सह संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे व शिवसेना तालुकाप्रमुख गणेश उतेकर जिल्हा परिषद सदस्य अजित सकपाळ पंचायत समिती सदस्य संजय शेलार गट विकास अधिकारी सचिन मस्के, तहसीलदार सतीश पाटील, पोलीस अधिकारी हर्षद गावडे विजय नायडू सतीश पाटील, त्यांच्यासह चंद्रकांत जंगम गुरुजी संभाजी भिलारे संदेश सावंत अमित जाधव संभाजी जाधव पत्रकार जितेंद्र केंद्रे विजय विभुते आणि नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आशा व अंगणवाडी सेविकांना सुद्धा संविधान उद्देशिका वितरित करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांनी दिलेल्या घोषणेमुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
राज्यात प्रथमच अशा स्वरूपाचा कार्यक्रम होत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, राज्यातील अकरा किल्ल्यांवर असा कार्यक्रम होत आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समानता आणि समतेचा विचार दिला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी याच तत्वावर स्वराज्य उभारले. या दोन्ही महामानवांच्या विचारांचा एकत्र जागर या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. दोनच राजे इथे जन्मले एक त्या रायगडावर… एक त्या चवदार तळ्यावर… या गाण्याला व इतर गीतानाही उपस्थित नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वच नागरिकांनी संविधानाचे पावित्र्य जपण्याचे काम करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री देसाई यांनी केले.
यावेळी गड संवर्धनासाठी स्वच्छता मोहीम ही राबवण्यात आली. तसेच शाहिर सुरेश जाधव यांचे पोवाडा सादरीकरण झाले.
वन विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने गडावर स्वच्छता राखण्याचे काम स्वयंसेवकांनी केले. या कार्यक्रमामुळे जागोजागी पोलिसांनी चांगल्या पद्धतीने बंदोबस्त केला होता. प्रतापगडावरील शौर्याच्या व परिक्रमाच्या गाथा ऐकून अनेकांनी इतिहासामध्ये घडलेल्या संदर्भाला अभिवादन केले. तळदेव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य शिबिरे आयोजित केले होते. त्याला उपस्थितांनी चांगली दाद दिली. प्रतापगडावर पालकमंत्री आदरणीय देसाई व सातारा जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी पायथ्यापासून चालत आले होते. त्यावेळी व्यायामाचा अभाव असल्याने राजकीय नेत्यांच्या काही समर्थकांनाही गड चढताना घाम फुटला होता. तर अधिकाऱ्यांच्या फिटनेस लक्षणीय दिसून येत होता. विशेष बाब म्हणजे सातारा व महाबळेश्वर येथून खास कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या वृत्त प्रतिनिधींची वन विभागाच्या वतीने उत्तम व्यवस्था केल्याबद्दल पत्रकारांनीही त्यांचे आभार मानले. ………………………… फोटो- प्रतापगडावर संविधान दिन साजरा करताना मान्यवर.( छाया- निनाद जगताप, प्रतापगड)

Scroll to Top