ताज्या बातम्या

शहीद तुकाराम ओंबळे यांच्या केडंबे गावात अभिवादन…

केळघर(अजित जगताप) : मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये अजमल कसाब याला जिवंत पकडून देणारे मुंबई पोलीस दलातील सहाय्यक फौजदार शहीद तुकाराम ओंबळे यांच्या केडंबे गावात ग्रामस्थ व मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सातारा जिल्ह्यातील केडंबे ता.जावळी हे गाव शहीद ओंबळे यांच्या शौर्याने संपूर्ण जगाच्या नकाशावर आले आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटी या ठिकाणी शहीद तुकाराम ओंबळे यांच्या अर्ध पुतळ्याला अनेकांनी अभिवादन केले. त्याचबरोबर त्यांचे मूळ गावी सुद्धा अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सातारा जिल्ह्यातील २३ पुरस्कार प्राप्त कॅप्टन ज्ञानदेव मोरे,पत्रकार अजित जगताप, महेश चव्हाण, सूर्यकांत पाटणकर यांनी सुद्धा केडंबे गावी भेट देऊन शहीद तुकाराम ओंबळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. सध्या या ठिकाणी स्मारक उभारणीचे काम सुरू करण्यासाठी शासकीय पातळीवर निधी मंजूर झालेला आहे. या कामासाठी सर्व जण पाठपुरावा करत असली तरी अद्याप त्याला यश आले नाही. याची खंत अनेकांनी बोलून दाखवली आहे. दरवर्षी २६/११ या निमित्त शहीद तुकाराम ओंबळे व दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व देश प्रेमी नागरिकांची आठवण काढली जाते. अनेक ठिकाणी बॅनरबाजी व अभिवादनाचे कार्यक्रम होतात. पण, शहिदांच्या गावातच अद्यापही स्मारक झाले नाही. राज्य सरकारने हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आता पावले उचलणे गरजेचे आहे. अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
शहीद तुकाराम ओंबळे
जनसेवा विकास प्रतिष्ठान केडंबे यांच्यावतीने
गुरुवारी दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या हस्ते शहीद तुकाराम ओंबळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .सकाळी दहा वाजता नेहरू युवा मंडळ केडंबे व ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य व खाऊ
वाटप झाले .सकाळी अकरा वाजता जनसेवा विकास प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने शासकीय दवाखान्यात रुग्णांना फळे वाटप व आरोग्य शिबिर तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र केडंबे येथे नेत्र तपासणी शिबिर झाले . याचा परिसरातील अनेकांनी लाभ घेतला. या सर्व कार्यक्रमासाठी नेहरू युवा मंडळ, ग्रामस्थ व जनसेवा विकास प्रतिष्ठान, केडंबे तालुका जावळी यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.

Scroll to Top