ताज्या बातम्या

धारावीच्या संविधान चौकात भारतीय संविधान दिनाचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

मुंबई : प्रज्ञा प्रतिष्ठान आणि प्रणाली सेवाभावी महिला असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने धारावी येथील संत रोहिदास मार्गावरील संविधान चौकात भारतीय संविधान दिनाचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल शिवराम कासारे यांनी केले. अपर्णा अनिल कासारे यांनी बौद्ध विधी पार पाडला, तर प्रणाली सेवाभावी महिला असोसिएशनच्या अध्यक्षा गौतमी सुनील जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला ONGC SC-ST असोसिएशनचे अध्यक्ष जागेशकुमार सोमकुंवर, बहुजन समाज पार्टीचे मुंबई सचिव श्यामलाल जैस्वाल, काँग्रेसचे मुंबई सचिव सुभाष पाखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे धारावी विधानसभा अध्यक्ष उल्लेश गजाकोश, माजी आमदार बाबुराव माने, शेकापचे मुंबई अध्यक्ष राजू कोरडे, बेस्ट समितीचे सदस्य रमाकांत गुप्ता, भाजपचे विनोद कांबळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिगर मोरे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख मायाताई जाधव, लक्ष्मी कावळे, राजू व्हटकर, संजीवन जैस्वार, मुकेश दिवेकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शेकापचे मुंबई सचिव राजू कोरडे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून उपस्थितांकडूनही तिचे वाचन करून घेतले. त्यानंतर मान्यवरांनी संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी आयोजकांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करत उपस्थितांना लाडूवाटप करण्यात आले. संविधानाप्रती आदर व्यक्त करत सामाजिक एकता आणि बंधुतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Scroll to Top