ताज्या बातम्या

भाजप-आरएसएसचा विचार देशासाठी घातक; संविधान बदलण्याचा डाव हाणून पाडा – खा. वर्षा गायकवाड

मुंबई : भारतीय संविधान दिनानिमित्त मुंबई काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र व मुंबई काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत खेरवाडी जंक्शन ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे पूर्व या मार्गावर ही रॅली काढण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. सिरिवेल्ला प्रसाद म्हणाले की, भाजपचा विचार मनुवादी तर काँग्रेसचा विचार संविधानवादी आहे. भाजप-आरएसएसचा विचार देशासाठी घातक असून संविधानाने दिलेले समान अधिकार हिरावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देश संविधानानुसारच चालला पाहिजे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस संसदेत तसेच रस्त्यावरही लढा देत आहे. संविधानाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान बदलून मनुस्मृतीच्या आधारावर देश चालवण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, असे आवाहन केले. संविधानामुळे दलित, वंचित, मागासवर्गीय आणि महिलांना समान अधिकार, मतदानाचा हक्क व आरक्षण मिळाले. त्यामुळे संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या रॅलीत माजी मंत्री अस्लम शेख, आमदार अमीन पटेल, डॉ. ज्योती गायकवाड, भाई जगताप, माजी मंत्री नसीम खान, हुसेन दलवाई, डॉ. भालचंद्र मुणगेकर, चरणसिंग सप्रा, सचिन सावंत, सुरेशचंद्र राजहंस, अशरफ आझमी यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Scroll to Top