कराड(प्रताप भणगे) : कराडजवळील जुन्या कोयना पुलाच्या परिसरात करण्यात आलेल्या बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पुलाजवळ सूचना फलक आणि लोखंडी कमानीच्या खांबाला आधार देण्यासाठी करण्यात आलेल्या बांधकामाची अवस्था छायाचित्रात दिसून येत आहे. सिमेंट काँक्रीटला तडे गेले असून विटाही विस्कटलेल्या अवस्थेत आहेत.
महत्त्वाच्या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. अशा ठिकाणी सूचना फलक आणि लोखंडी कमानीच्या आधाराचे बांधकाम इतक्या खराब अवस्थेत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित काम कोणत्या विभागाच्या देखरेखीखाली करण्यात आले? कामाचा दर्जा तपासण्यात आला होता का? तसेच या कामाची गुणवत्ता तपासणी झाली आहे का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
संबंधित विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून बांधकामाची गुणवत्ता तपासावी, आवश्यक दुरुस्ती करावी आणि दोषी कामाची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.




