
सातारा(विजय जाधव) : नशेच्या विळख्यातून युवकांना बाहेर काढत विकसित भारताच्या निर्मितीसाठी युवा शक्तीला दिशा देण्याचा संदेश साताऱ्यात घुमला. छत्रपती शिवाजी कॉलेज येथे आयोजित ‘विकसित भारत यूथ पार्लियामेंट २०२७’ आणि ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ स्पर्धेत युवकांनी आपल्या विचारांची ताकद, वक्तृत्व आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचे प्रभावी दर्शन घडविले.
मेरा युवा भारत (माय भारत), सातारा आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठांतर्गत छत्रपती शिवाजी कॉलेज येथे जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडल्या. ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या विषयावर यूथ पार्लियामेंटमध्ये युवकांनी ठाम भूमिका मांडत व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा निर्धार व्यक्त केला. तर यंग लीडर्स डायलॉगच्या पीपीटी राऊंडमध्ये इनोव्हेशन इकॉनॉमी, पर्यटन आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्री या विषयांवर कल्पक सादरीकरणे झाली.
स्पर्धेतील यूथ पार्लियामेंटमध्ये विठ्ठल दत्तात्रय जगताप यांनी प्रथम, नेहा निलेश माने यांनी द्वितीय, तर तेजोमयी नरेंद्र पवार यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर
यंग लीडर्स डायलॉग पीपीटी राऊंडमध्ये पंकज गांधी यांनी प्रथम, दिव्या सदावरते यांनी द्वितीय, मुद्रा विजय जाधव यांनी तृतीय, चैतन्य यादव यांनी चतुर्थ, वैष्णवी रोकडे यांनी पाचवा आणि अबुजार नदाफ यांनी सहावा क्रमांक मिळविला.
या जिल्हास्तरीय स्पर्धेतून निवड झालेले स्पर्धक राज्यस्तरीय फेरीत सहभागी होणार असून, पुढील टप्प्यात राष्ट्रीय स्तरावर दिल्ली येथे दि. १२ जानेवारी २७ रोजी होणाऱ्या युवा महोत्सवात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
कार्यक्रमास डॉ. अनिल कुमार वावरे, क्रीडा अधिकारी संस्कृती मोरे, प्रा. डॉ. साळुंखे, प्रा. डॉ. शिवाजी पाटील, स्वप्निल जाधव, डॉ. राजेंद्र तांबिले, डॉ. सुभाष कारंडे, प्रा. नवनाथ इप्पर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण पत्रकार विजय मांडके, प्राचार्य विजय जाधव, ॲड. शेरखंड डांगे, भानुदास यादव, डॉ. संजय सरगडे, प्राचार्य शाली जोसेफ, प्रा. महादेव चिंदे यांनी केले.
प्रास्ताविक माय भारत जिल्हा युवा अधिकारी स्वप्निल देशमुख यांनी तर सूत्रसंचालन सायली पडवळ यांनी केले. आयोजनासाठी महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापक, कर्मचारी , विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माय भारत आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अक्षय माने, गणेश पवार, प्रीती जाधव, स्नेहल शेळके यांनी परिश्रम घेतले.




