गोराई : स्तन कर्करोगाविषयी जनजागृती करण्याबरोबरच कर्करोगग्रस्त महिलेला सकारात्मक दृष्टिकोनातून जगण्याची आणि स्वतःचा नव्याने स्वीकार करण्याची प्रेरणा देणारी ‘शीरो’ ही कादंबरी असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मधुकर वर्तक यांनी काढले. स्तन कॅन्सरवर मार्गदर्शन करणारी आणि जनजागृती करणारी ही पहिलीच कादंबरी असल्याचे त्यांनी नमूद केले. लेखिका डॉ. सुनिता चव्हाण यांच्या ‘शीरो’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी वैभव लक्ष्मी हॉल, गोराई येथे उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. मधुकर वर्तक होते. कादंबरीचे प्रकाशन डिंपल पब्लिकेशनतर्फे करण्यात आले.
डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे यांनी प्रास्ताविक करताना लेखिका डॉ. सुनिता चव्हाण यांच्या लेखनशैलीचे विशेष कौतुक केले. अशा आशयपूर्ण आणि समाजोपयोगी कादंबरीच्या प्रकाशनाची संधी आपल्या प्रकाशन संस्थेला मिळत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. पल्लवी परुळेकर बनसोडे यांनी ‘शीरो’ ही कादंबरी कर्करोगग्रस्त महिलेला सकारात्मक दृष्टिकोनातून जगायला शिकवणारी आणि स्वतःचा नव्याने स्वीकार करण्याची प्रेरणा देणारी असल्याचे सांगितले.
स्तन कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहून वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्त्रीरोग आणि स्तन कॅन्सर शल्यविशारद डॉ. प्राची ठाकर यांनी केले. स्तन कर्करोगाचे वेळीच निदान आणि योग्य उपचार यांचे महत्त्व त्यांनी विशद केले.
वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे डॉ. सुनिता चव्हाण यांनी ‘शीरो’ या कादंबरीत स्तन कर्करोगाची लक्षणे, तपासण्या, निदान, उपचारपद्धती, शस्त्रक्रिया आणि उपचारांनंतरचे जीवन यांची माहिती सहज, सोप्या आणि ओघवत्या भाषेत कथानकाच्या माध्यमातून मांडली आहे.
कर्करोगाविषयीची भीती दूर करून योग्य माहिती, सकारात्मक समुपदेशन आणि आत्मविश्वासाच्या बळावर या आजाराला सामोरे जाण्याची प्रेरणा देणे, हा या कादंबरीमागील प्रमुख उद्देश आहे.
साहित्य आणि आरोग्यप्रबोधन यांची सुंदर सांगड घालणारी ‘शीरो’ ही कादंबरी कर्करोगग्रस्त महिला, त्यांचे कुटुंबीय आणि सर्वसामान्य वाचकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रकाशन सोहळ्यास प्राध्यापक ज्योतिषाचार्य रत्नदीप कर्णिक, सुनील चव्हाण, कौतुक मुळे यांच्यासह अनेक साहित्यिक, पत्रकार, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि विविध क्षेत्रांतील व्यक्ती उपस्थित होत्या. उपस्थितांनी लेखिका डॉ. सुनिता चव्हाण यांच्या या साहित्यिक आणि जनजागृतीपर उपक्रमाचे कौतुक केले.




