मुंबई

: शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात गेल्या २७ वर्षांपासून उल्लेखनीय योगदान देणारे शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. गोरखनाथ अंजना महादेव पोळ यांना त्यांच्या प्रदीर्घ कार्याची दखल घेत ‘शिक्षण, साहित्य व समाजसेवा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. केतकी प्रकाशनच्या दिवाळी अंक २०२६ च्या प्रकाशन सोहळ्यात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केतकी प्रकाशन आणि जनमत लोकमत चॅनेल यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात दिवाळी अंक प्रकाशन आणि केतकी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २१ मान्यवरांचा केतकी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अलका भरत नाईक, महाराष्ट्र सांस्कृतिक कला केंद्र विभागाचे प्रमुख प्रसिद्ध लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे आणि शिक्षणसम्राट व्ही. टी. पाटील उपस्थित होते. केतकी प्रकाशनचे संस्थापक चंद्रकांत जाधव, पाटील सर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
डॉ. गोरखनाथ पोळ यांनी गेल्या २७ वर्षांपासून शिक्षण, समाजप्रबोधन आणि साहित्यनिर्मितीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या शैक्षणिक अनुभवाची, सामाजिक बांधिलकीची आणि साहित्यिक कार्याची दखल घेऊन त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना आकर्षक नॅपकिन बुके, शाल, सन्मानचिन्ह आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेली पुणेरी पगडी प्रदान करून गौरविण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. पोळ म्हणाले की, गेली २७ वर्षे आपण शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून या प्रवासात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, साहित्य व प्रकाशन क्षेत्रात तब्बल ४५ वर्षांची गौरवशाली परंपरा निर्माण करणाऱ्या केतकी प्रकाशनकडून जीवनगौरव पुरस्कार मिळणे ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. स्वराज्याच्या उभारणीत एखादा गड-किल्ला जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांना जो आनंद झाला असेल, तसाच अपार आनंद आज हा पुरस्कार स्वीकारताना होत आहे. हा सन्मान भविष्यात शिक्षण, साहित्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्यासाठी नवी ऊर्जा देणारा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या सोहळ्यात जनसंवाद, क्रीडा, शिक्षण, साहित्य, कला, लोकसंस्कृती, सामाजिक कार्य आणि संस्थात्मक नेतृत्व अशा विविध क्षेत्रांतील योगदानाचा गौरव करण्यात आला. पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये योगेशचंद्र डी. लोहोकारे, डॉ. मंदार पनवेलकर, डॉ. अनंता धरणेकर, डॉ. संजय रहाटे, आर. व्ही. सिंग, डॉ. वसंतराव तुकाराम पाटील, कु. खुशी संजय रहाट, संतोष सिंग, दीपक पाटील, प्रथमेश नंदकुमार मळईकर, रवींद्र उबा पाटील, बाळकृष्ण निवृत्ती आठवले, राकेश सिंग, मंजिरी पाटील, यास्मिन उस्मान शेख, जे. एन. कुरुप, डॉ. अलका भरत नाईक, गुलाबराव शिंदे, दिलीप शंकरराव पाटील, डॉ. गणेश चंदनशिवे आणि रचिता बर्मन यांचा समावेश होता.
केतकी प्रकाशनच्या या उपक्रमातून विविध क्षेत्रांत निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना व्यासपीठ मिळाले असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची प्रेरणादायी परंपरा जपली जात असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. डॉ. गोरखनाथ पोळ यांच्या या सन्मानाबद्दल शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




