कराड : वाढदिवस म्हटले की मित्रमंडळी, केक, शुभेच्छा आणि आनंदाचा सोहळा असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र, आपल्या आनंदाच्या क्षणात समाजातील गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांनाही सहभागी करून घेत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. याच विचारातून पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांनी आपला वाढदिवस शिवशंभो वृद्धाश्रम सेवा मंडळ ट्रस्ट, नेर्ली येथे साजरा केला. या उपक्रमातून त्यांनी सामाजिक जाणीव आणि माणुसकीचे दर्शन घडविले.
शिवशंभो वृद्धाश्रमाच्या वतीने पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचे औक्षण करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे आयोजन वृद्धाश्रम संस्थेचे सचिव हनमंत पाटील यांनी केले होते. त्यांच्या आग्रहाखातर पत्रकार शेवाळे यांचे औक्षण करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी शेवाळे यांनी वृद्धाश्रमाला भेट देत तेथील ज्येष्ठ महिला आणि वृद्धांशी संवाद साधला. या प्रसंगी वृद्धाश्रमातील वातावरण आनंदमय झाले होते.
यावेळी संस्थेच्या संचालिका मनीषा माने यांच्यासह वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिला उपस्थित होत्या. वाढदिवसाच्या निमित्ताने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिलांच्या सहवासात काही क्षण घालवून त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधण्यात आला. अशा छोट्या-छोट्या उपक्रमांतून वृद्धांना भावनिक आधार मिळतो, तसेच त्यांच्याप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते.
“माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो,” या भावनेतून वाढदिवसासारखा वैयक्तिक आनंदाचा दिवस सामाजिक कार्यासाठी समर्पित करणे, ही निश्चितच प्रेरणादायी बाब आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात ज्येष्ठ नागरिकांना वेळ देणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांना आपलेपणाची जाणीव करून देणे, ही काळाची गरज आहे. पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या या उपक्रमातून समाजातील इतरांनीही सामाजिक बांधिलकी जपावी, असा सकारात्मक संदेश मिळाला.
वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या या उपक्रमामुळे आनंदाचा क्षण केवळ स्वतःपुरता मर्यादित न राहता समाजातील ज्येष्ठ व्यक्तींसोबतही वाटून घेता आला. वृद्धांचा आशीर्वाद, माणुसकीची भावना आणि समाजाप्रती असलेली कृतज्ञता यांचा संगम घडविणारा हा वाढदिवस सामाजिक जाणीवेचा एक सुंदर आदर्श ठरला.




