ताज्या बातम्या

ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी यांना स्व. यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार प्रदान

मुंबई : महाराष्ट्र राज्य संपादक परिषदेचा पहिला आणि मानाचा स्व. यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार मराठवाड्यातील ज्येष्ठ, अनुभवी पत्रकार संजीव कुलकर्णी यांना नांदेड येथे प्रदान करण्यात आला. परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार कृष्णा शेवीकर यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील घडामोडींचा सखोल अभ्यास, दीर्घ अनुभव आणि व्यासंगी लेखन यामुळे संजीव कुलकर्णी यांची पुरस्कारासाठी निवड सार्थ असल्याचे मत कृष्णा शेवडीकर यांनी व्यक्त केले. दैनिक लोकसत्ता आणि पुढारीचे नांदेड प्रतिनिधी म्हणून त्यांनी पत्रकारितेत केलेल्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, माजी विरोधी पक्षनेते महेश खोमणे, मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी, ज्येष्ठ पत्रकार धोंडोपंत विष्णुपुरीकर, प्रदीप नागापूरकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य संपादक परिषदेचे सदस्य अमृत देशमुख, राजेश पटणे, किरण कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, भास्कर ढवळे, गजानन वाग्पावन, भास्कर डोईबोळे आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी संजीव कुलकर्णी यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नरेश दंडवते यांनी केले.

नाना पटोले यांच्याहस्तेही गौरव….

संजीव कुलकर्णी यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा सुरू असताना जवळच्या सभागृहात काँग्रेस नेते नाना पटोले यांची पत्रकार परिषद सुरू होती. पत्रकार परिषद संपल्यानंतर नाना पटोले यांनी पुरस्कारप्राप्त संजीव कुलकर्णी यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Scroll to Top