कराड(ज्ञानेश्वर शेवाळे) : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने असलगाव येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी जिल्हास्तरीय विशेष कार्यशाळा आणि समाजसेवकांचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यशाळेत बुलढाणा जिल्ह्यातून ग्रामीण पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पत्रकारितेची सद्यस्थिती, आव्हाने आणि संघटनात्मक बांधिलकी यावर सखोल मंथन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तसेच आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून झाली. यानंतर उपस्थितांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख होते, तर व्यासपीठावर तहसीलदार पवन पाटील, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, सहायक गटविकास अधिकारी सुधाकर वायाळ, प्रदेश संपर्कप्रमुख अरुण कुलथे, केंद्रीय कार्यालयप्रमुख बाबाराव खडसे, प्रदेश सरचिटणीस अभिमन्यू भगत, कार्यालयप्रमुख मंगेश राजनकार बुलढाणा पुर्व
जिल्हाध्यक्ष राजू घाटे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलताना वक्त्यांनी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या उपक्रमाची प्रशंसा केली. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्न समाजासमोर मांडण्यात पत्रकारांची भूमिका मोलाची असून शासन, प्रशासन व नागरिक यांच्यातील पत्रकार हा महत्त्वाचा दुवा असल्याचे वक्त्यांनी अधोरेखित केले. याप्रसंगी पत्रकार संघाचे बाबाराव खडसे आणि अध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनी निर्भीड, निष्पक्ष व जबाबदार पत्रकारितेचे महत्त्व स्पष्ट करत संघटनात्मक बळकटी आणि समन्वयाचे आवाहन केले.
या कार्यशाळेचे औचित्य साधून समाजात निस्वार्थी योगदान देणाऱ्या दुर्लक्षित सत्प्रवृत्तींचा शाल, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये १५० ते २०० महिलांची मोफत व सुरक्षित बाळंतपणे करणाऱ्या शांताबाई तायडे, शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल माजी केंद्रप्रमुख मधुकर ढोले आणि स्वतः मजूर असतानाही स्वखर्चाने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभारून स्मशानभूमीत बाकडे उपलब्ध करून देणाऱ्या रामेश्वर राखोंडे यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे जळगाव जामोद येथे बुलढाणा अर्बनच्या रुग्णवाहिका व स्वर्गरथाद्वारे रात्रंदिवस रुग्णांना योग्य वेळेत हॉस्पिटल पर्यंत पोहचविणारे व मृतदेहांना सेवा देणारे संजय सुलताने, शेकडो विषारी-अविषारी सापांना सुरक्षित जीवनदान देऊन निसर्ग व वन्यजीवांचे रक्षण करणारे सर्पमित्र शरद जाधव, ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाचे कठीण व संवेदनशील काम निष्ठेने पार पाडणारे शेख इस्माईल शेख इब्राहिम (मलिक), सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रुग्णांचे प्राण वाचवणारे सूरज यादव, गोरगरीब रुग्णांवर अत्यंत कमी खर्चात निरंतर उपचार करणारे डॉ. अग्रवाल आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासोबतच अनेक सामाजिक-सांस्कृतिक व्यासपीठांवर आपल्या अभ्यासू वक्तृत्वाने उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे अनिल भगत यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल भगत यांनी केले, सूत्रसंचालन अनिल भगत यांनी पार पाडले, तर शेवटी तालुका अध्यक्ष किशोर दाताळकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष कुलथे, अश्विन राजपूत, मनिष ताडे, सुरेश मानकर, अविनाश घोडके, संतोष मांजरे, बाजारे, रुपेश कलंत्री, श्रीकृष्ण गावंडे, विनायक तळेकर, विजय जोशी, आणि इमरानखान यांच्यासह संघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्ह्यातील पत्रकार व मान्यवरांच्या मोठ्या उपस्थितीत आणि स्नेहभोजनाने या सोहळ्याची यशस्वी सांगता झाली.




