ताज्या बातम्या

कार्तिक स्वामी दर्शनासाठी राजपुरीत महिला भाविकांची गर्दी….

पाचगणी(अजित जगताप) : थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र राजपुरी येथील पुरातन कार्तिक स्वामी मंदिरात मंगळवारी कार्तिक पौर्णिमेच्या दुर्मिळ योगानिमित्त शेकडो भाविक महिलांनी गर्दी केली होती. पहाटे ते सायंकाळपर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सुमारे बारा हजारांहून अधिक भाविकांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले.

इतर दिवशी महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यास मनाई असते. तीन वर्षांतून येणाऱ्या या विशेष दर्शनाच्या संधीचे महिला भाविकांनी सोनं केले. विविध भागांतून महिला भाविक मोठ्या संख्येने आल्या होत्या. सह्याद्रीच्या डोंगररांगांत वसलेल्या या प्राचीन कातळकोरीव लेणीत वाळूपासून साकारलेली कार्तिक स्वामींची मूर्ती आणि गोमुखातून अखंड वाहणारी जलधारा धार्मिक वातावरण तयार करत होते. त्यात सोबत भजनामुळे परिसर भक्तीमय बनला होता. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर अधिकच उजळून निघाले होते.
राजपुरी ग्रामस्थांकडून भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आला तसेच सामाजिक जाणीव ठेवून रक्तदान शिबिर ही संपन्न झाले. या धार्मिक कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मंडळ आणि कार्तिकस्वामी कला क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चांगली व्यवस्था केली होती. त्याचे पर्यटन भाविकांनी मनापासून कौतुक केले आहे. पर्यटन व दर्शनाच्या आनंदाने खऱ्या अर्थाने महिला भाविकांचा दुहेरी फायदा झाला.

महाबळेश्वर व पाचगणी परिसरातील राजपुरी, आंब्रळ व खिंगर जवळ अरुंद रस्त्यामुळे भाविक व पर्यटकांच्या वाहनांच्या लांब रांगा तर दुसऱ्या बाजूला मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी रांग दृश्य पाहण्यास मिळाले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे महिला संचारिका रूपाली राजपुरे व माजी संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, किशोर पंचायत समिती सभापती शकुंतला चोरमले, सदस्या वंदना भिलारे , जिल्हा परिषद सदस्य संजय कळगने आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

फोटो- राजपुरी येथील मंदिरात लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिक असूनही देवाच्या दारात रांगेमध्ये उभे राहून दर्शन घेणारे मान्यवर.. (छाया- रविकांत बेलोशे पाचगणी)

Scroll to Top