सोलापूर(अजित जगताप) : भारतीय राजकारणामध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या २०१४ पासून भारतीय जनता पक्षासोबत राजकीय युती करणाऱ्या आरपीआय (आठवले गट) यांना सत्तेच्या भागीदारीमध्ये नियमित दुजाभावाचा सामना करावा लागत होता. याबाबत आता आर.पी.आय.च्या स्थानिक नेत्यांनी सुद्धा शिक्षक व पदवीधर मतदार संघात धडा शिकवण्याची बैठकीद्वारे सुरुवात केली आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आर.पी. आय. पक्षाच्या माध्यमातून किमान ३० ते ४० हजार शिक्षक व पदवीधर मतदार आहेत. विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबवताना आर.पी.आय.च्या स्थानिक नेत्यांची नेहमीच या मतदारांना गरज वाटते. आर.पी.आय.चे पाच जिल्ह्यातील नेतेगण जे आदेश देतील. त्या अनुषंगाने शिक्षक व पदवीधर मतदार संघात मतदान करण्याची भूमिका अनेकांनी व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या ठिकाणी आर.पी.आय. समविचारी स्वाभिमानी नेते व कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीला सातारचे आर. पी. आय. पर्यावरण प्रदेशाध्यक्ष अशोक बापू गायकवाड , पश्चिम महाराष्ट्र आर.पी.आय.( आठवले गट) कार्याध्यक्ष संजय कांबळे, महाराष्ट्राचे संघटक सचिव शहाजी कांबळे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे, पुणे येथील असिद गांगुर्डे, महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशीताई वाघमारे त्यांच्यासह अडीचशे ते तीनशे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपसोबत सत्तेसाठी आर.पी.आय. कार्यकर्त्यांनी वाड्या वस्तीमध्ये जाऊन प्रचार केला. सत्ता आणली. परंतु, गेली बारा वर्षांमध्ये वाटाघाटी मध्ये भाजपला वाटा मिळत गेला पण आर.पी.आय.च्या घाटा सुरू झाला आहे. सध्याचे वातावरण पाहता भाजप विरोधात सर्व देशात देश बांधवांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर सामाजिक कार्यकर्ते व परिवर्तनवादी तसेच आंबेडकरवादी अभिजीत दीपके, संतोष पंडित, विद्यानंद बापट आणि विवेकानंद पाटील अशा चार तरुणांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जन आंदोलनातून भाजप सरकार विरोधात जनजागृती केली आहे. आज खेड्यापाड्यातून सुद्धा भाजप विरोधी भूमिकेला उदंड प्रतिसाद लाभत आहे. खऱ्या अर्थाने आर.पी.आय. नेतृत्वाला आता भाजपासोबत युती करताना वेगळा विचार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची भेट घेऊन प्रमुख कार्यकर्ते हे पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघामध्ये कार्यकर्त्यांच्या इच्छाखातिर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यासाठी दबाव वाढत आहे. आर.पी.आय.चे उमेदवार नसले तरी सम विचारी पक्षाच्या उमेदवाराला सहकार्य करण्याची मानसिकता बैठकीतून व्यक्त होत आहे. अशी माहिती आरपीआयच्या प्रमुख नेत्यांनी दिली आहे.




