ताज्या बातम्या

लाला लजपतराय विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केवल उके यांना ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६’ प्रदान

मुंबई : लाला लजपतराय विधी महाविद्यालयाचे प्राचार्य (प्रभारी) डॉ. केवल उके यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला आहे. एज्युकेशन सप्लाय अँड फ्रँचायझी एक्स्पो (ई.एस.एफ.ई.) यांच्या वतीने द टाईम्स ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित पुरस्कार सोहळ्यात ८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील नेस्को, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे त्यांना ‘बेस्ट प्रिन्सिपल इन कॉलेज’ या श्रेणीतील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान, शैक्षणिक नेतृत्व, विधी शिक्षणाचा विकास आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

डॉ. केवल उके हे विधी शिक्षण, संशोधन आणि शैक्षणिक प्रशासन या क्षेत्रांत सक्रियपणे कार्यरत आहेत. अध्यापनासोबतच संशोधन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रसारासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.

“डॉ. केवल उके यांना मिळालेला ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६’ हा त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव असून, त्यांच्या या यशामुळे संस्थेची मान उंचावली आहे. भविष्यातही त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात असेच उल्लेखनीय कार्य करून संस्थेच्या प्रगतीत योगदान द्यावे,” असे प्रतिपादन लाला लजपतराय शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. कमल गुप्ता यांनी केले.

या पुरस्कारामुळे लाला लजपतराय विधी महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठेत भर पडली आहे. डॉ. उके यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

डॉ. केवल उके यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव असून, विधी शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

Scroll to Top