पुणे(अजित जगताप) : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा कोअर कमिटीची बैठक भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा संघटनात्मक तयारी, कार्यकर्त्यांची भूमिका, शिक्षक व पदवीधर मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचण्यासाठी विचार विनिमय झाला. निवडणुकीची रणनीती, नियोजन आणि आगामी काळातील कार्यदिशा यावर सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.
युवकांना सक्षम करून त्यांच्या प्रगतीसाठी नव्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच शिक्षक व पदवीधरांच्या विविध प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे. यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना अधिक बळकट करणे आणि शिक्षक व पदवीधर मतदारांशी प्रभावी संवाद साधणे, या दृष्टीनेही अनुभवी नेत्यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, मंत्री व पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री श्री. जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ, भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री. राजेश पांडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार श्री. निरंजन डावखरे, आमदार धैर्यशील कदम, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती प्रियाताई महेश शिंदे, पुणे पदवीधर मतदारसंघ भाजप उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव, शिक्षक मतदार संघ भाजप उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.




