मुंबई(रमेश औताडे) : ९ ते १५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून जागतिक टपाल सप्ताह साजरा करण्यात आला. या वर्षासाठी जागतिक टपाल दिनाची संकल्पना ‘ जागतिक टपाल नेटवर्क, अमर्याद शक्यता ‘ अशी ठेवण्यात आली आहे. या प्रसंगी महाराष्ट्र मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जयभाये यांनी विविध सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र पोस्टात सध्या ३.५९ कोटींहून अधिक लाईव्ह बचत खाती कार्यरत असून इंडिया पोस्ट पेमेंट बँक द्वारे लाखो नागरिकांना त्यांच्या दारात बँकिंग सेवा पुरवली जात आहे. याशिवाय आधार नोंदणी, पार्सल वितरण, आणि आंतरराष्ट्रीय टपाल सेवांमध्ये विभागाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. १२ ऑक्टोबर रोजी ‘फिलाटेली दिन’ साजरा केला जाणार असून यादरम्यान दुर्मिळ तिकीट प्रदर्शन, कार्यशाळा आणि २५ विशेष टपाल आवरणांचे अनावरण केले जाईल. १३ ऑक्टोबर रोजी ‘आर्थिक समावेशकता दिना’निमित्त सर्व उपविभागांमध्ये ‘डाक चौपाल’ आयोजित करून नागरिकांना थेट बँकिंग आणि सरकारी योजनांशी जोडले जाईल.
१४ ऑक्टोबर रोजी ‘टपाल व पार्सल दिना’निमित्त कर्मचार्यांसाठी सॉर्टिंग स्पर्धा आणि प्रमुख उद्योजक ग्राहकांसाठी विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहाचा शेवट १५ ऑक्टोबर रोजी ‘तंत्रज्ञान व नाविन्यता दिना’ने होणार असून यादरम्यान कर्मचारी आणि ग्राहकांसाठी विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली जाईल.




