
सातारा(विजय जाधव) : ” बदलत्या युगात नवीन आव्हानांना सामोरे जाताना १०७ वर्षांचा प्रदीर्घ वारसा असलेली रयत शिक्षण संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मन, मेंदू आणि मनगट यांचे एकात्म नाते असणारे विद्यार्थी घडविणे आजच्या काळाची गरज आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या दूरदृष्टीचा वारसा पुढे नेणे ही आपली नैतिक जबाबदारी असून, रयत शिक्षण संस्थेतून नवे एकलव्य घडत आहेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, वक्ते, लेखक संजय आवटे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या १०७ व्या वर्धापन दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी अध्यक्षस्थानी होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एम. बी. शेख, व्हा. चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलाधिपती खासदार सुप्रिया सुळे, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, जे. के. जाधव, अजित पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
*विचार समृद्ध पिढी घडविणे गरजेचे*
संजय आवटे म्हणाले, आधुनिक जग हे माध्यमांचे जग झाले आहे. त्यामुळे माध्यमांचा जपून आणि योग्य पद्धतीने वापर होणे आवश्यक आहे. समाजामध्ये सकारात्मक बदल घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विचारसमृद्ध, गुणवत्तापूर्ण आणि करिअरच्या नव्या वाटा शोधणारा विद्यार्थी घडविणे महत्त्वाचे आहे. केवळ शिक्षण देण्यापेक्षा स्वतंत्रपणे विचार करणारी पिढी घडविणे हे शिक्षकांसमोरील मोठे आव्हान आहे. रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक हे आव्हान समर्थपणे पेलत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा परिचय करून दिला.
*शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा महत्त्वाचा*
चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या भविष्यातील प्रगतीबाबत भूमिका मांडली. रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा संस्थेच्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे सचिव किशोर राजेशनिंबाळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखड्याचे चित्रदर्शिकेच्या माध्यमातून अनावरण करण्यात आले.
*गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव*
यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथील विद्यार्थी साहिल जाधव याने आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्याच्या पालकांचा सन्मान करण्यात आला.
तसेच रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ आदर्श विभाग, उपक्रमशील शाखा, उपक्रमशील शिक्षक, लाईफ वर्कर, लाईफ मेंबर, प्राचार्य, आदर्श स्वायत्त महाविद्यालये, आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी, विज्ञान शिक्षक आणि कार्यक्षम गुरुकुल प्रमुख आदी पुरस्कार प्रदान करण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणवत्तागौरव पुरस्कार प्राप्त शिक्षिकेचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले. माध्यमिक विभागाचे सहसचिव श्री. बी. एन. पवार यांनी पुरस्कारांचे वाचन केले. उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, ऑडिट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, अॅड. दिलावर मुल्ला यांच्यासह संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, कर्मवीर कुटुंबीय, आजीव सभासद, आजीव सेवक, शाखाप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी आभार मानले.




