मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना अपंग सहाय्य सेनेच्या वतीने अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा, शिवसेनेच्या कार्याचा तसेच ठाकरे कुटुंबीयांच्या सामाजिक व सार्वजनिक योगदानाचा शैक्षणिक अभ्यास करणाऱ्या पाच पीएच.डी. धारकांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जन्मशताब्दी वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार शिवसेना अपंग सहाय्य सेनेने हा उपक्रम हाती घेतला आहे.
अकोला येथील शिवसेना महिला संघटक सौ. सरिता विजय वाकोडे यांनी ‘शिवसेनेचे मानवतावादी कार्य’ या विषयावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात महत्वपूर्ण प्रबंध सादर करून पीएच.डी. प्राप्त केली आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री व लोकसभेचे माजी अध्यक्ष प्रा. मनोहर जोशी यांनी शिवसेनेवर संशोधन करून मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली होती. तसेच त्यांनी ‘शिवसेना : काल, आज आणि उद्या’ हे अभ्यासपूर्ण पुस्तकही लिहिले आहे.
ज्येष्ठ संपादक श्री. सुकृत खांडेकर यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संपादकत्वाखाली २३ जानेवारी १९८९ रोजी सुरू झालेल्या दैनिक ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रावर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक विद्यापीठ, पुणे येथून पीएच.डी. प्राप्त केली आहे.
तसेच दैनिक ‘सामना’चे प्रतिनिधी श्री. अनंत गुरव आणि अमरावती येथील श्री. मनीष देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी समाजसुधारक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जीवनकार्यावर संशोधन करून पीएच.डी. प्राप्त केली आहे.
या पाचही संशोधकांच्या कार्यातून मातोश्री आणि ठाकरे कुटुंबीयांनी महाराष्ट्र तसेच देशासाठी केलेल्या योगदानाचा शैक्षणिक व संशोधनात्मक दस्तऐवज समोर आला आहे. या कार्याची कृतज्ञतापूर्वक दखल घेत शिवसेना अपंग सहाय्य सेनेतर्फे या पाचही पीएच.डी. धारकांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
हा सन्मान सोहळा रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या भव्य सभागृहात, दुसरा मजला, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते खासदार श्री. अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे आणि सरचिटणीस सुभाष कदम यांनी सर्व शिवसैनिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आशीर्वाद द्यावा, असे आवाहन केले आहे.



