ताज्या बातम्या

महाबळेश्वर मध्ये विस्तारित गावठाणासाठी सेना नेते व उपमुख्यमंत्र्यांकडे साकडे….

महाबळेश्वर(अजित जगताप) : महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील सर्वच गावातील गावठाणाच्या बाबत धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे झाले आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे विस्तारित गावठाणाला मंजुरी दिल्यास लोकांची गैरसोय दूर होणार आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुभाष कारंडे यांनी आज शिवसेना पक्ष नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरेतांब गावी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील विस्तारित गावठाणासाठी महसूल विभागाच्या संबंधितांना सूचना केल्या जाईल असा शब्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे.

निसर्गरम्य परिसर आणि शिवसागर जलाशय व जंगल यामध्ये व्यापून टाकलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील परिसर म्हणजे अतिवृष्टी व निसर्गाशी एकरूप झालेला डोंगराळ व विस्तीर्ण तालुका आहे . महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त पर्जन्यमान या ठिकाणी होते . महाबळेश्वरला येणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा प्रकार होतो. जनजीवन विस्कळीत होते. स्थानिक नागरिक नेहमीच नैसर्गिक आपत्तींना सामोरे जात असतात.

महाबळेश्वर तालुक्यामधील सर्व गावांमध्ये सध्या गावठाणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. फार पूर्वी प्रत्येक गावाला असलेले जुने गावठाण वाढत्या लोकसंख्येमुळे अपुरे पडत आहे. आज अखेर नवीन गावठाण झालेले नाही. त्यामुळे भूमिपुत्रांना घर बांधणीसाठी आवश्यक जमीन उपलब्ध होत नाही. इको सेन्सिटिव्ह झोन व वन विभागाच्या कायद्यामुळे आहे त्याच घरामध्ये चार चार कुटुंबांना राहावं लागते. काही गावांमध्ये तर अजिबात गावठाण नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्या स्वतःच्या शेतजमिनीमध्ये स्वतःच्या कुटुंबासाठी व कुटुंब विस्तारानुसार घरांची बांधणी केली आहे. अनेक वर्षांपासून विस्तारित गावठाणाची मागणी प्रलंबित आहे.

स्थानिक भूमिपुत्र शेतकऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी घर बांधले असेल किंवा पर्यटकांचा विचार करून आर्थिक हातभार लागावा. या हेतूने कृषी पर्यटन व घरगुती पर्यटन निवासस्थान बांधकाम केले असेल, तर ते अनाधिकृत ठरवण्याचा सपाटा सध्या महसूल विभागाने लावला आहे. तो सर्वच ग्रामस्थांसाठी अन्यायकारक आहे. या ठिकाणी उपयोजितेसाठी कोणताही लघु किंवा सूक्ष्म उद्योग नाही. पर्यटकांच्या जीवावर येथील अर्थकारण चाललेले आहे. पावसाळ्यात तीन महिने सर्व उद्योग ठप्प झालेले असतात. त्यामुळे भूमिपुत्र असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच गावांना वाढीव गावठाण मंजूर करून दिलासा द्यावा. ज्यांनी आपल्या वहिवाट असलेल्या मोकळ्या व शेतामध्ये घर बांधलेले आहेत. त्यांना गावठाणाचा दर्जा द्यावा. महसूल खात्याची कारवाई थांबवावी. अशी महाबळेश्वर तालुक्यातील सर्व ग्रामस्थांची विनंती आहे. सामाजिक कार्यकर्ते सुभाष कारंडे यांच्यावतीने उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा झालेली आहे.

अशी माहिती तापोळा येथील रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते सुभाष कारंडे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रसार माध्यमाचे बोलताना दिली आहे. दरम्यान महाबळेश्वर पर्यटन स्थळ असले तरी महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड , माचुतर,क्षेत्र महाबळेश्वर ,जुने महाबळेश्वर,तापोळा वाळणे, उचाट.मांघर मालुसर.आवाकाळी, कुंभारोशी.पार , चतुरबेट या गावांना वाढीव गावठाण गरजेचे बनले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील ११८ गावांमध्ये अशीच परिस्थिती आहे. वाढीव गावठाणामुळे या भागातील लोकांचं जीवनमान उंचावणार आहे. असे ही त्यांनी स्पष्ट केले. …………………………. फोटो– महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देताना भूमिपुत्र व सामाजिक कार्यकर्ते सुभाष कारंडे (छाया- अजित जगताप , तापोळा)

Scroll to Top