ताज्या बातम्या

AI द्वारे बनावट फोटो तयार करून ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची बदनामी; जनसंपर्क अधिकारी अमरसिंह मोकाशी यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा

सातारा : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार ना. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सोशल मीडियावर AI (कृत्रिम बुद्धिमत्ता), डिजिटल एडिटिंग व मॉर्फिंग तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट व आक्षेपार्ह फोटो तयार करून प्रसारित केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जनसंपर्क अधिकारी अमरसिंह मोकाशी (वय ५०, रा. कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा) यांनी यासंदर्भात पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
६ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या ‘राजधानी सातारा दहीहंडी उत्सव २०२६’ कार्यक्रमादरम्यानचा ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा एक मूळ फोटो घेऊन त्यामध्ये AI, डिजिटल एडिटिंग आणि मॉर्फिंगच्या माध्यमातून फेरफार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या माध्यमातून बनावट व बिभत्स स्वरूपाचा फोटो तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. यामुळे महाराजांच्या वंशजांची तसेच लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या सोशल मीडिया अकाउंट्सवर गुन्हा
अमरसिंह मोकाशी यांच्या फिर्यादीवरून Pratik Thorat – देशभक्त Gen Z (फेसबुक अकाउंट/पेज), Sonalie Deshmukh (फेसबुक प्रोफाइल), Hari Shinde (फेसबुक प्रोफाइल) आणि Mandesh-Prime-News (यूट्यूब व इंस्टाग्राम चॅनेल) यांच्याशी संबंधित व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५३(२), ३५६(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन गणपतराव म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस करत आहेत. सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या छायाचित्राचा स्रोत, त्यामध्ये करण्यात आलेले फेरफार तसेच संबंधित सोशल मीडिया खात्यांमागील व्यक्तींची माहिती तपासातून समोर येणार आहे.

Scroll to Top