मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदत मिळावी, या सामाजिक उद्देशाने महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लावणी कलावंत महासंघाच्या वतीने ‘लावण्यसोहळा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन २६ ऑक्टोबर रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित राहू शकले नसल्याने आयोजकांच्या भूमिकेतून नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सांस्कृतिक क्षेत्रातील संघटनांनी पुढाकार घ्यावा, या आवाहनाला प्रतिसाद देणारी लावणी कलावंत महासंघ ही महाराष्ट्रातील पहिली संघटना असल्याचा दावा आयोजकांनी केला. मंत्र्यांच्या आवाहनानंतर अवघ्या अर्ध्या तासात ई-मेलद्वारे कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी दर्शवून महासंघाने प्रत्यक्ष पुढाकार घेतला होता.
२६ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे सांस्कृतिक मंत्र्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर मंत्री आशिष शेलार सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेपर्यंत संबंधित परिसरात उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, लावणी कलावंत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व कलाकारांनी त्यांची भेट घेऊन कार्यक्रम लवकर सुरू करण्याची विनंती केली. त्यानुसार कार्यक्रमही लवकर सुरू करण्यात आला. मात्र, मंत्री आशिष शेलार यांनी कार्यक्रमस्थळी येऊन उपस्थिती लावली नसल्याने आयोजकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या सोहळ्याला मुंबईच्या महापौर रितू तावडे, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर आणि नगरसेविका यामिनी जाधव, डॉ कौतिक दांडगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पहिला पुढाकार घेणाऱ्या संघटनेच्या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्र्यांनी उपस्थिती का लावली नाही? त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या कलावंत महासंघाकडून नेमकी कोणती अपेक्षा होती? या प्रश्नांची उत्तरे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार देतील का, अशी चर्चा आता सांस्कृतिक क्षेत्रात सुरू झाली आहे.
शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाला शासनाकडून प्रोत्साहन मिळणे अपेक्षित असताना, आयोजकांच्या मते मंत्र्यांची अनुपस्थिती खटकणारी ठरली आहे.




