ताज्या बातम्या

डॉ.संदीप डाकवे ‘स्वच्छतादूत’ पुरस्काराने सन्मानित

तळमावले/वार्ताहर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथील ग्रंथालय विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या महत्त्वपूर्ण सोहळ्यात स्वच्छता व जनजागृतीच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण व लोकोपयोगी उपक्रम राबवून भरीव योगदान दिल्याबद्दल डॉ.संदीप डाकवे यांना महाविद्यालयाच्या वतीने स्वच्छतादूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रो. (डॉ.) उषादेवी साळुंखे या होत्या.
डॉ.संदीप डाकवे यांनी स्वच्छतेच्या अनुषंगाने अनेक अभिनव व प्रेरणादायी उपक्रम राबवले आहेत, ज्यांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या प्रमुख उपक्रमांमध्ये स्वच्छतादूत पुस्तकाची निर्मिती व विविध माध्यमांत स्वच्छता संदेश छापल्यास प्रिंटिंगमध्ये विशेष सूट देण्याची अभिनव संकल्पना, लग्नपत्रिकेतून स्वच्छता संदेशाचा प्रसार, गुढीपाडव्यानिमित्त स्वच्छता संदेश देणाऱ्या शुभेच्छापत्रांचे वितरण, स्वच्छ सर्वेक्षण नावामध्ये अक्षरगणेशा रेखाटून ब्रँडिंगचा प्रयत्न, एक अक्षरगणेशा स्वच्छतादूतांसाठी विशेष उपक्रम, बातम्यांच्या कात्रणांचे प्रदर्शन, हस्तलिखित तयार करणे व बॅनर बनवून प्रभावी जनजागृती, व्यंगचित्रातून स्वच्छता जनजागृतीचा प्रयत्न, कचरावेचक गाडी चालकाचा संविधान देऊन आणि घंटागाडी चालकांचा स्वच्छता योद्धा पुरस्काराने गौरव, तसेच स्वच्छताविषयक ७५ लेखांच्या पोस्टरचे साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ग्रंथपाल योगेश शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.सौ.दीपाली पाटील यांनी केले, तर आभार डॉ.महेश चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाची छायाचित्रे प्रा.धिवर सर यांनी काढली असून फलक लेखन प्रा. डॉ. राजेंद्र लादे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल जाधव व गुरुदेव कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर पुरस्काराबद्दल संदीप डाकवे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Scroll to Top