सातारा(विजय जाधव) : सातारा येथील सावकार होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका स्वीकारत दिवसभर महाविद्यालयाचे कामकाज सांभाळले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांविषयी आदर, जबाबदारीची जाणीव, नेतृत्वगुण आणि व्यवस्थापन कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
कार्यक्रमाच्या विशेष सत्रात नाशिक येथील योगविद्या धाम केंद्रातून ‘डिप्लोमा इन योगा’ अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांचा योगाचार्य शैलजा ठोके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना शैलजा ठोके म्हणाल्या, “डॉक्टरांनी केवळ रुग्णांवर उपचार करण्यापुरते मर्यादित न राहता समाजाला निरोगी जीवन जगण्याची प्रेरणा दिली पाहिजे. त्यासाठी डॉक्टरांनी प्रथम स्वतः निरोगी राहणे आवश्यक आहे. नियमित योगासने आणि प्राणायामामुळे शरीरासोबत मनाचे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते. आजचा विद्यार्थी हा उद्याचा ‘आरोग्यदूत’ आहे. या भावनेतून विद्यार्थ्यांनी योगविद्येचा अभ्यास करावा.”
डॉ. शितल इनामदार यांनी योग व प्राणायामाचे महत्त्व विशद केले. यावेळी डॉ. गुलनार बागवान, डॉ. राजश्री देवी यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. श्वेता बागडे, डॉ. सलोनी राजमाने आणि डॉ. गुलनार बागवान यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पूजा पिसाळ हिने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. मनीष इनामदार, मुद्रा जाधव, आविष्कार शिंदे, रणजित सुतार, श्रेया फुटक, निकिता थोरात आणि शिवानी देवकर यांनी परिश्रम घेतले.
चौकट
१५० हून अधिक विद्यार्थी करणार ‘डिप्लोमा इन योगा’
सावकार होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी प्रोत्साहन दिले जाते. गतवर्षी ३० विद्यार्थ्यांनी ‘डिप्लोमा इन योगा’ अभ्यासक्रम पूर्ण केला. यंदा विद्यार्थ्यांचा उत्साह आणखी वाढला असून तब्बल १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी नाशिक येथील योगविद्या धाम केंद्राच्या ‘डिप्लोमा इन योगा’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. मनीष इनामदार यांनी दिली.
चौकट
चार विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांना विद्यापीठाची मान्यता
शॉर्ट टर्म रिसर्च ग्रँट अंतर्गत सावकार होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. यामध्ये नव्या पाठणी – ऑस्टिओआर्थरायटिस (सांध्यांची झीज), किशोरी सहाणे – ओबेसिटी (लठ्ठपणा), श्रेया मारुती फुटक – ॲनिमिया (रक्तक्षय) आणि सुजन मुल्ला – मायग्रेन (अर्धशिशी) या विषयांवरील संशोधन प्रकल्पांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.




