मुंबई : शिवसेनेचे संघटक तसेच बृहन्मुंबई गुजराती समाज आणि महाराष्ट्रातील गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष म्हणून दीर्घकाळ कार्यरत असलेले ज्येष्ठ समाजसेवक, पत्रकार व साहित्यिक डॉ. हेमराज शाह यांचे आज वयाच्या ८४व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात अरविंद शाह व उदय शाह ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
समाजकारण, पत्रकारिता, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात कोणत्याही सत्तापदाची अपेक्षा न ठेवता निःस्वार्थपणे कार्य करणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. हेमराज शाह यांची ओळख होती. समाजातील अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देणे, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आणि विविध समाजघटकांना एकत्र आणणे, हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य होते.
बृहन्मुंबई गुजराती समाज तसेच महाराष्ट्रातील गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अखेरपर्यंत काम केले. मुंबईसह महाराष्ट्रातील गुजराती समाजाला संघटित करण्याबरोबरच समाजात एकोपा आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.
‘कच्छ-शक्ती’ या वार्षिकाचे संपादक म्हणून त्यांनी कच्छी व गुजराती समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक उपक्रमांना सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून दिले. गुजराती भाषा, साहित्य आणि राजकारण या विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक कार्याचा गौरव म्हणून ‘माणुसकीचा झरा : हेमराज शाह’ हा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. तसेच त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘हेमराज शाह : एक समर्पित जीवन’ या माहितीपटाला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाला होता.
सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना मानद डॉक्टरेटनेही सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, पत्रकार आणि समाजातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शिवाजी पार्क येथे झालेल्या त्यांच्या अंत्यसंस्कारावेळीही विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. हेमराज शाह यांनी सत्तेच्या राजकारणापेक्षा समाजसेवा, माणुसकी आणि सामाजिक एकोपा यांना प्राधान्य देत आयुष्यभर केलेले कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.




