सानपाडा : राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक ७८, गौतमनगर, रबाळे येथील विद्यार्थ्यांनी शानदार सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला.
‘पर्यावरण संरक्षण’ हा विषय घेऊन इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी लावणी या लोकनृत्य प्रकारातून मनोरंजनासोबतच पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. आकर्षक नृत्य, प्रभावी सादरीकरण आणि प्रबोधनात्मक आशयामुळे विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला परीक्षक व उपस्थितांची दाद मिळाली.
या सादरीकरणासाठी गीतलेखन नारायण लांडगे यांनी केले असून, संगीत संयोजन, पार्श्वगायन व नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी रीता नागज्योती यांनी सांभाळली. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेतील शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमींकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
पर्यावरण संरक्षणासारखा महत्त्वपूर्ण विषय लोककलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडल्याने या सादरीकरणाचे विशेष कौतुक होत आहे.




