ताज्या बातम्या

‘संवाद नात्यांचा’ : कविता डॉट कॉमचा शंभरावा प्रयोग आणि चौथा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

नवी मुंबई : शिवतुतारी प्रतिष्ठान, नवी मुंबई संचलित ‘संवाद नात्यांचा’ कविता डॉट कॉम या साहित्य संस्थेचा चौथा वर्धापन दिन तसेच कविता डॉट कॉमचा शंभरावा प्रयोग राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, रबाळे येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकर सोनवणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकशाहीर प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ आगरी कवी पुंडलिक म्हात्रे यांना जीवनगौरव पुरस्कार व राजमुद्रा प्रदान करून सन्मानित करण्यात आले. म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात मुंबईत मराठी माणूस उपरा होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच ‘हरकत काय हाय तुमची’ ही प्रसिद्ध आगरी कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली.
शिवतुतारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविकात परदेशातील कार्यक्रमांपेक्षा गावागावांत मराठी साहित्य, कविता आणि संस्कृती पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. ऑनलाइन संवादापेक्षा प्रत्यक्ष माणसामाणसांतील संवाद अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करत तळागाळातील समाजाने शिक्षणाचे महत्त्व जाणून घेण्याचे आवाहन केले. प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी लोकसाहित्य, लोकपरंपरा व आख्यानांची माहिती देत संत जनाबाई, संत एकनाथ, संत तुकाराम यांच्या लोकपरंपरेतून समाजप्रबोधनाची दिशा स्पष्ट केली. त्यांनी विविध लोकगीते तसेच ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील गीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर गोपाळे व नारायण लांडगे-पाटील यांनी केले. साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि साहित्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top