मुंबई(शांताराम गुडेकर ) : घाटकोपर (पश्चिम), मुंबई येथील हिंदी विद्या प्रचार समितीचा ८८ वा स्थापना दिन सोहळा श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी श्री वैजनाथ साबू सभागृहात उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विद्या प्रचार समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह होते. यावेळी घाटकोपर पश्चिमचे नगरसेवक धर्मेश गिरी आणि घाटकोपर पूर्वच्या नगरसेविका श्रीमती राखी जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी तसेच संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी हायस्कूल, घाटकोपरचे मुख्याध्यापक राजेंद्र डी. सिंह यांनी केले. कार्यक्रमात डॉ. राजेंद्र सिंह, डॉ. उषा मुकुंदन, उमेश सिंह, डॉ. हिमांशु दावडा, राजेंद्र डी. सिंह, राजदीप वीरेंद्र सिंह, राजीव सिंह, आदित्य प्रकाश सेंगर, परिमल अरविंद सिंह, डॉ. मधुरा कलमकर, श्रीमती संगीता मेहरोत्रा, नवभारत पेपर चे संपादक ब्रजमोहन पांडे, नगरसेवक धर्मेश गिरी आणि श्रीमती राखी जाधव यांचे स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीतामुळे कार्यक्रमस्थळी उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
धर्मेश गिरी आणि श्रीमती राखी जाधव यांनी आपल्या मनोगतात हिंदी विद्या प्रचार समितीमार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थांच्या योगदानाचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेंद्र सिंह यांनी हिंदी विद्या प्रचार समितीच्या प्रदीर्घ शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीचा आढावा घेतला. शिक्षण क्षेत्रातील संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे हिंदी विद्या प्रचार समितीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या हिंदी हायस्कूल, हिंदी प्राथमिक व माध्यमिक विभाग, श्री इंद्रदेव सिंह हिंदी हायस्कूल इंग्रजी माध्यम प्राथमिक व माध्यमिक विभाग, श्री इंद्रदेव सिंह इंटरनॅशनल स्कूल (CBSE), राम निरंजन झुनझुनवाला महाविद्यालय आणि HVPS लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम. यामध्ये गणेश वंदना, आरोहण, भारूड, वराहस्वरूपम्, ‘अटल भक्ती–अजय शक्ती’, ‘Say NO to Drugs’, ‘युग बदलले, सवाल वही, न्याय कहाँ?’ ही नाटिका, वारकरी वारी नृत्य तसेच ‘क्या से क्या हो गया’ यांसारख्या विविध कलाविष्कारांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणांना उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. शामल खानविलकर यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या योगदानाचेही कौतुक करण्यात आले.शेवटी आरती आणि प्रसाद वितरणाने या ८८ व्या स्थापना दिन सोहळ्याची सांगता झाली.




