ताज्या बातम्या

उंडाळे येथे उघड्या विद्युत पेट्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

कराड(प्रताप भणगे) : उंडाळे परिसरातील रस्त्यालगत असलेल्या विद्युत यंत्रणेजवळ मोठ्या प्रमाणात गवत व झाडाझुडपांची वाढ झाली आहे. तसेच विद्युत पेट्यांना झाकणे नसल्याने त्यातील विद्युत भाग उघडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना विजेचा धक्का बसण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या ठिकाणापासून जवळच शाळा व महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. उघड्या विद्युत पेट्या आणि अस्ताव्यस्त वीजवाहिन्यांमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पावसाळ्यात परिसरात गवत वाढल्याने आणि ओलावा असल्याने हा धोका आणखी वाढू शकतो. त्यामुळे संबंधित वीज वितरण विभागाने तातडीने पाहणी करून विद्युत पेट्यांना सुरक्षित झाकणे बसवावे, उघड्या विद्युत भागाची दुरुस्ती करावी तसेच परिसरातील गवत व झाडाझुडपे हटवावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Scroll to Top