
कराड : कराड एस.टी. आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी नवीन राजमाता जिजाऊ बसेस दाखल झाल्या असून, त्यांचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कराड व परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने नव्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कराड आगारातील बससेवा अधिक सक्षम करण्यासाठी नवीन बसेस मिळाव्यात, अशी मागणी प्रवासी, नागरिक तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. यासाठी एस.टी. महामंडळाकडे अनेकांनी निवेदने व अर्जही केले होते. या मागणीचा पाठपुरावा करत आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, कराड आगाराला नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत.
दररोज कराड व परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक एस.टी. बससेवेचा वापर करतात. त्यामुळे प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत आगारातील बससेवा सक्षम करण्याची गरज होती. नवीन बसेस दाखल झाल्याने ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, कराड एस.टी. आगारातील प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबतही ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्राने सातत्याने आवाज उठविला होता. आगारातील प्रवाशांसाठी असलेले बाकडे तुटलेल्या अवस्थेत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याची तसेच आगार परिसरात गर्दुल्यांचा वावर असल्याची बाब वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. या वृत्ताची दखल घेत आगारात नवीन बाकडे बसविण्यात आले होते.
मात्र, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता आगाराला नवीन बसेसचीही नितांत गरज होती. अखेर आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून नवीन राजमाता जिजाऊ बसेस उपलब्ध झाल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कराड आगाराच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या सुविधांसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल आमदार डॉ. अतुल भोसले यांचे नागरिक व प्रवाशांकडून आभार मानण्यात येत आहेत. नव्या बसेसमुळे कराड तालुक्यासह परिसरातील एस.टी. प्रवाशांना अधिक चांगली आणि विश्वासार्ह प्रवास सुविधा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




