पुणे : आज दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रीय चर्मकार संघ, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आयोजित आढावा व महापरिसंवाद निर्णायक बैठक तसेच पदनियुक्ती प्रदान सोहळा पुणे येथे उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रम राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार श्री. बाबूरावजी माने यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
या बैठकीमध्ये संघाच्या आगामी वाटचालीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. संघाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, चर्मकार समाजातील विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे, समाजातील युवक व महिलांना संघटित करणे तसेच संघाचा राज्यभर विस्तार करणे याबाबत महत्त्वपूर्ण विचारविनिमय करण्यात आला. यावेळी नवीन कार्यकारिणीची निवड करून पदाधिकाऱ्यांना पदनियुक्ती प्रदान करण्यात आली.यावेळी चर्मकार समाजाचे नेते म्हणून मुंबई शहराचे माजी अध्यक्ष आबासाहेब पतंगे यांना पदभार देण्यात आला तसेच मुंबई( मध्य )शहराचे अध्यक्ष म्हणून चर्मकार समाजाचे अभ्यासक सुरेश काळे व मुंबई( पूर्व) उपनगराचे अध्यक्ष म्हणून संविधान प्रचारक विलास गोरेगांवकर यांना पदभार दिला तसेच मुंबई (पश्चिम )उपनगर अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते व मुंबई महानगरपालिका फेरीवाला मतदारसंघातून निवडून आलेले अशोक देहरे यांना यावेळी पदभार दिला आहे.चांभार, ढोर, होलार, मादीगा, मोची, अहिरवार इत्यादी पाच पन्नास जातीत विखुरलेल्या चर्मकार समाजाला एकत्रित आणून भक्कम अस्तित्व निर्माण करण्याचे ठरविण्यात आले व चर्मकार समाजाच्या जगण्याच्या संघर्षाला सन्मान मिळावा म्हणून सर्व पातळ्यांवर आक्रमक लढा उभारण्याच्या दृष्टीने पाऊल टाकणे संदर्भात दिवसभर चौफेर चिंतन करण्यात आले.तसेच जोपर्यंत मागासवर्गीयांच्या समस्येवर तोडगा निघत नाही तोपर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
या कार्यक्रमास चर्मकार समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव ,महिला भगिनी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अॅड. नारायणजी गायकवाड, राष्ट्रीय सल्लागार राम कदम, प्रदेश कार्याध्यक्ष राजेश खाडे, मुंबई अध्यक्ष विलास गोरेगावकर, समन्वयक मिलिंद खैरे, मुंबई कार्याध्यक्ष अशोक देहरे, सुरेश काळे, नवी मुंबई कार्याध्यक्ष विनोद पाखरे, समाजनेते परशुराम इंगोले, ज्येष्ठ नेते जगन्नाथ खाडे, प्रकाश दिघे, अॅड. कैलास आगवणे, मुंबई महिला कार्याध्यक्ष सौ. पायल खरे, राजेश साबळे ,उत्तम सोनवणे,पाचरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय चर्मकार संघाच्या माध्यमातून चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.




