
धारावी : भारताचा ८०वा स्वातंत्र्य दिन यंदा पर्यावरणपूरक उपक्रमाने साजरा करत धारावीतील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या राजे शिवाजी विद्यालयात ‘Segregate to Educate’ या जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात शेकडो विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या उपस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या कचरा वर्गीकरण व सामाजिक जनजागृती या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
संगम प्रतिष्ठान या पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्थेने सुरू केलेल्या या उपक्रमाचा नुकताच महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला होता. त्यानंतर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या अभियानाचे प्रत्यक्ष बीजारोपण धारावीतील शाळेत करण्यात आले.
धारावीचे माजी आमदार श्री. बाबुराव माने यांनी या उपक्रमाची दखल घेत आपल्या शैक्षणिक संस्थेतही हा उपक्रम राबविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार स्वातंत्र्य दिनी राजे शिवाजी विद्यालयात या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी संगम प्रतिष्ठानच्या सचिव आणि या विषयाच्या अभ्यासक अॅड. कोमल तानाजी घाग यांनी कचरा वर्गीकरणाचा क्लिष्ट वाटणारा विषय विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना अतिशय सोप्या व हलक्याफुलक्या भाषेत समजावून सांगितला. तिरंग्याच्या तीन रंगांसोबत निळ्या रंगाची सांगड घालत कचरा वर्गीकरणाचे महत्त्व त्यांनी रंजक उदाहरणांतून स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या विषयाबाबत उत्सुकता निर्माण झाली.
मुंबई महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभागातील धारावी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अधिकृतपणे सुका कचरा वर्गीकरण केंद्र चालविणाऱ्या संगम प्रतिष्ठानच्या पर्यावरणपूरक कार्याचे माजी आमदार बाबुराव माने यांनी कौतुक करून संस्थेचे आभार मानले.
या उपक्रमासाठी मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक आणि सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ‘पर्यावरण मित्र’ म्हणून कार्यरत असलेले श्री. तानाजी घाग यांचीही उपस्थिती होती.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक आणि महापौर तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या संकल्पनेतील या उपक्रमाचे बीजारोपण धारावीतील शाळेत झाल्याने, ‘Segregate to Educate’ हे अभियान मुंबईतील अधिकाधिक शाळा व महाविद्यालयांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प संगम प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कचरा वर्गीकरणाची सवय विद्यार्थ्यांपासून घराघरात पोहोचवून स्वच्छ आणि पर्यावरणपूरक मुंबई घडविण्याचा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.




