ताज्या बातम्या

रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरूच ; समाजसेविका वैशाली गावडे यांचा आंदोलनाचा इशारा

मुंबई(रमेश औताडे) : मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील नावाजलेल्या महानगरपालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. मात्र, याच मुंबई महापालिकेच्या टी.बी. रुग्णालयात झुरळांचा सुळसुळाट झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्याऐवजी त्यांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याचा आरोप महलत महिला मंडळ अध्यक्षा समाजसेविका वैशाली गावडे यांनी केला आहे.

वैशाली गावडे यांनी रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णालय परिसरात झुरळ, अस्वच्छता आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात त्यांनी संबंधित प्रशासनाकडे निवेदनही सादर केले आहे.

टी.बी.सारख्या गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे अपेक्षित असताना रुग्णालयातच झुरळांचा उपद्रव वाढणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे गावडे यांनी म्हटले आहे. रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थेवर नियमित देखरेख ठेवली जाते की नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

निवेदन देऊनही सुधारणा झाली नाही तर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. रुग्णालय प्रशासनाने तातडीने स्वच्छता व्यवस्था सुधारावी, झुरळांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि रुग्णांना स्वच्छ वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी गावडे यांनी केली आहे.

या प्रकरणावर आता जाहीर पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणार असल्याचे वैशाली गावडे यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकार परिषदेनंतरही रुग्णालय प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही, तर रुग्णांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आशिया खंडात नावाजलेल्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात अशी परिस्थिती निर्माण होणे ही महापालिका प्रशासनासाठी निश्चितच चिंतेची बाब असून, प्रशासन या तक्रारीची किती गांभीर्याने दखल घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Scroll to Top