कराड(प्रताप भणगे) : फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारा जिल्हास्तरीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत १६ वर्षांखालील वयोगटातील लांबउडी या क्रीडा प्रकारात कु. अनुष्का आनंदा करांडे हिने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशामुळे तिची डेरवण, जि. रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कु. अनुष्का करांडे ही श्री. निनाईदेवी विद्यालय, तुळसण येथील विद्यार्थिनी असून, तिच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयासह तुळसण परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अनुष्काच्या या यशाबद्दल ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. आनंदराव पाटील, सर्व संचालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक सदानंद शेवाळे सर तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच निनाईदेवी सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव वीर व सर्व संचालक मंडळानेही तिचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अनुष्काला या स्पर्धेसाठी दत्ता पाटील वस्ताद आणि आनंदराव जानुगडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनातून आणि अनुष्काच्या मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेतही अनुष्का उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या विद्यालयाचे, तुळसण गावाचे आणि सातारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.




