ताज्या बातम्या

शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राज्यव्यापी दौरा यशस्वी

मुंबई : शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संघटनेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त राज्यव्यापी जनसंपर्क व संघटन विस्तार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या जिल्ह्यांचा चार दिवसीय दौरा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कोयना रत्न राजाराम बुवा शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य संघटक विनोद शिंदे, प्रवीण तांबे आणि कदम यांच्या उपस्थितीत हा दौरा पार पडला. या दौऱ्यात प्रत्येक जिल्ह्यात कलावंतांचे मेळावे आयोजित करण्यात आले असून, स्थानिक जिल्हाध्यक्षांनी कार्यक्रमांचे नियोजन व आयोजन प्रभावीपणे पार पाडले.

या मेळाव्यांमधून संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्याबरोबरच कलावंतांना एकत्र आणणे, संघटना अधिक मजबूत करणे आणि आगामी उपक्रमांची माहिती देण्यात आली. राज्यभरातील कलावंतांमध्ये संघटनेविषयी उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

संघटनेचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा ७ ऑक्टोबर रोजी दादर (प्रभादेवी) येथील रवींद्र नाट्यमंदिरात दिमाखात आयोजित करण्यात आला असून, राज्यभरातील कलावंत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

यापुढील टप्प्यात सोलापूर, पंढरपूर, सांगली, कोल्हापूर, कराड आणि सातारा या जिल्ह्यांचा राज्यव्यापी दौरा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी संस्थापक अध्यक्ष कोयना रत्न राजाराम बुवा शेलार यांनी सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्यात संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सक्रियपणे कार्य करावे आणि कलावंतांना संघटनेशी जोडण्यासाठी प्रयत्न वाढवावेत, असे आवाहन केले.

Scroll to Top