ताज्या बातम्या

माया मोरे यांना पहिला पाटण भूषण पुरस्कार जाहीर

तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने देण्यात येणारा पहिला मानाचा पाटण भूषण पुरस्कार सौ.माया हणमंत मोरे यांना देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली आहे. सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, कोल्हापुरी फेटा, तात्या पुस्तक, शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पाटणच्या भूमीतील एका दिग्गज व्यक्तिमत्त्वाला पाटण भूषण पुरस्कार देण्याचे नियोजन आहे. माया मोरे या मुळच्या मोरेवाडी (कुठरे) येथील असून सध्या त्या अलिबाग येथे उपविभागीय पोलिस अधिकारी या पदावर काम करत आहेत.

सामाजिक जडणघडणीसाठी उल्लेखनीय योगदान देत असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांना राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड या पुरस्काराने गेली सात वर्षापासून गौरवण्यात येत आहे . या अवॉर्डने आपला स्वतंत्र ब्रॅण्ड निर्माण केला आहे. या पुरस्कार कार्यक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवले आहेत.
डाकेवाडी सारख्या दुर्गम भागात राहूनही संदीप डाकवे आणि त्यांचे सहकारी यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. या कामाची दखल घेत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पट्रस्टच्या कार्याचा गौरव केला आहे.

या पुरस्काराचे वितरण रविवार दि.29 नोव्हेंबर, 2026 रोजी सकाळी 10 वाजता वेणूताई चव्हाण स्मृती सदन कराड, ता.कराड, जि.सातारा येथे होणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी याप्रसंगी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी यांनी केले आहे.

Scroll to Top