कराड : मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्याजवळ ५ नोव्हेंबर रोजी उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात मालन मोहन सुतार (वय ६०, रा. काढणे, ता. पाटण) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा यशवंत मोहन सुतार गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर पंचायत समिती कराडचे सदस्य संग्रामबाबा अधिकारराव पवार यांनी कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन संबंधित साखर कारखाना प्रशासनाकडून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे.
निवेदनात मृत मालन सुतार यांच्या कुटुंबाला २५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच जखमी यशवंत सुतार यांच्या संपूर्ण वैद्यकीय उपचारांचा खर्च संबंधित कारखान्याने करावा आणि त्यांना १० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होत असल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक वाहनांवर ओव्हरलोडिंग, अपुरी सुरक्षा व्यवस्था, नियमानुसार वाहनांची देखभाल नसणे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने अपघातांचा धोका वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासन, आरटीओ आणि साखर कारखाना प्रशासनाने संयुक्तपणे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करावी, ओव्हरलोडिंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, तसेच अपघातप्रवण ठिकाणी विशेष तपासणी पथक नेमावे, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
८ नोव्हेंबरला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा!
संबंधित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत न मिळाल्यास रविवार, दि. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी ढेबेवाडी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संग्रामबाबा पवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक सातारा, जिल्हाधिकारी सातारा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, तहसीलदार कराड तसेच संबंधित साखर कारखाना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
आता प्रशासन या गंभीर घटनेची दखल घेऊन पीडित कुटुंबाला न्याय देणार का, याकडे कराड तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




